वाघाच्या भीतीने झाडावरून शेताची राखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:21 IST2018-11-16T00:19:56+5:302018-11-16T00:21:25+5:30
वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.

वाघाच्या भीतीने झाडावरून शेताची राखण
दिलीप बच्चूवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धाबा : वन्यजीवनांकडून शेतीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेताची राखण करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, दुहेरी संकटात सापडलेल्या बळीराजाने चक्क झाडावरच राखणीचा मारा बांधला. या माऱ्यात बसून शेताची राखण सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वाघ मानव संघर्ष शिगेला पोहचला आहे. अवनीचे शिकारप्रकरण देशात गाजत आहे. अवनीवरून वन्यजीवप्रेमी, गावकरी आमनेसामने उभे झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. जिल्ह्यातील काही भागात वाघ, बिबटांचे हल्ले सुरूच आहेत.
बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करीत संतप्त गावकऱ्यांनी कोठारी वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकले. एकीकडे वन्यजीवाकडून शेतीचे नुकसान होत आहे. दुसरीकडे वाघाची दहशत, अशा बिकटस्थितीत शेतीची राखण करण्याचा प्रश्न बळीराजासमोर उभा झाला आहे. शेतातील उंचवट्यावर मारा बांधून शेतीची राखण बळीराजा करीत आहे.
कुडेनांदगाव येथील हिराजी नामदेव कोरडे या शेतकऱ्याने चक्क झाडावरच मारा उभा केला. कोरडे यांची शेती जंगलालगत आहे. शेतात वन्यजीवांकडून मोठा हैदोस सुरू असतो, हे विशेष.