पशुधन घटल्याने मशागतीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:47 PM2019-05-30T22:47:21+5:302019-05-30T22:47:44+5:30
दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने घट झाल्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आता यांत्रिकी साधनांवर अवलंबून रहावे लागत आहे. काही दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी सद्या खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दिवसेंदिवस पशुधनामध्ये झपाट्याने घट झाल्यामुळे शेतीच्या मशागतीवर परिणाम होत असून शेतकऱ्यांना आता यांत्रिकी साधनांवर अवलंबून रहावे लागत आहे.
काही दिवसापूर्वी हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तालुक्यातील शेतकरी सद्या खरीप हंगामपूर्व मशागतीला लागले आहेत. शेतातील काडीकचरा नष्ट करणे, शेणखत टाकणे यासारखी कामे सद्या सुरू आहेत. त्यामुळे अनेक गावांतील शेतीमध्येशेतकरी व मजुरांची गर्दी वाढली आहे.
खरीप पूर्व हंगामातील मशागतीत काडीकचरा काढणे, वाळलेले गवत साफ करणे, वेली जाळणे, शेणखत पसरविणे यासारखी कामे मागील आठवड्यापासून सुरू आहेत. विशेष म्हणजे, अक्षयतृतीया सणानंतर या कामाला वेग येतो. त्यातच हवामान खात्याने अंदाज व्यक्त केल्यानंतर शेतातील पाळीवर उरलेले तूर व कपाशीच्या देठ तसेच शेतातील तणस काढण्याचे काम सुुरू असून अनेक शेतकरी बैल जोडीद्वारे शेणखत टाकत आहेत. काही वर्षापासून पाऊस उशीरा येत आहे. त्यामुळे पेरणी, मळणी ही कामे लांबतात. परिणामी शेती उत्पादनावर प्रतिकुल परिणाम होत आहे. धानाला मिळणारा भाव मात्र अद्यापही ज्वलंत समस्या आहे. खरीप हंगामपूर्व मशागतीतून पिकाला लागणारा खर्च वजा करता धानाची विक्री करून हातात काहीच शिल्लक राहत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तीन ते चार दशकांपासून विभक्त कुटुंब पद्धती वाढली आहे. त्यामुळे कुटुंब वाढले परंतु शेती विभागली, मनुष्याबळ कामी झाले. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने अनेक गावातील पशुधन कमी झाले.
यांत्रिकी साधने वाढले
काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांकडे गाय, बैल, म्हशी, शेळ्या यासारखी जनावरे होती. परंतु आता यांत्रिकीकरणामुळे पशुधन मोठ्या प्रमाणावर घटले. प्रत्येक गावामध्ये यांत्रिक साधने असले तरी वेळीच ती उपलब्ध होत नाही. परिणाम शेतकºयांना मशागतीसाठी प्रतीक्षा करावी लागते.