प्रतिनियुक्तीमुळे भूमी अभिलेख कार्यालयाचे कामकाज वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:08 AM2019-02-08T00:08:34+5:302019-02-08T00:09:39+5:30
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १५ पदे मंजूर आहे. मात्र यातील पाच अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून इतरत्र ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व तीन पदे रिक्त असल्याने केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
जयंत जेनेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात १५ पदे मंजूर आहे. मात्र यातील पाच अधिकारी गेल्या पाच महिन्यांपासून इतरत्र ठिकाणी प्रतिनियुक्तीवर व तीन पदे रिक्त असल्याने केवळ मोजक्याच अधिकाऱ्यांच्या भरवशावर असल्याने कार्यालयाचे कामकाज ठप्प झाल्याचे दिसून येत आहे.
तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात गुरूवारी फेरफटका मारला असता केवळ तीनच कर्मचारी कार्यरत असताना दिसून आले. दोन कर्मचारी शेतीच्या मोजणीसाठी गावांमध्ये गेल्याचे सांगण्यात आले. कार्यालयातील छाननी लिपिक, अभिलेखापाल, दोन भूकरमापक, एक कनिष्ठ लिपिक मागील पाच महिन्यापासून प्रतिनियुक्तीवर आहेत. परिणामी, टेबल रिकामे दिसून आले. अधिकारी उपलब्ध नसल्याने कार्यालयीन कामे रेंगाळली. एकाच अधिकाºयाला विविध पदांचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. १५ पैकी १२ पदे भरण्यात आली. एक भूकरमापक, शिपायांची दोन पदे अनेक वषार्र्पांसून रिक्त आहे. हा शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो. क्षेत्रफळ व लोकसंख्येने मोठा असल्याने कार्यालयाचा कामकाजाचा भार वाढत आहे. परंतु नियमबाह्य प्रतिनियुक्त्या दिल्याने कार्यालय कर्मचाºयांविना ओस पडले असल्याचे दिसून येते आहे.
कामाविना दिवस वाया
कोरपना तालुक्यात ११३ गावांचा समावेश आहे. बहुतांश गावे दुर्गम भागात वसली आहेत. कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने कामे होत नाही. शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तासन्तास ताटकळत उभे राहावे लागते. संपूर्ण दिवस जातो. आदिवासी, ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना हा खर्च झेपत नाही. प्रशासनाने ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी आहे.