रोगट कापसामुळे जिनिंगच्या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:45 PM2018-03-14T23:45:22+5:302018-03-14T23:56:39+5:30

यावर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन फार कमी झाले.

Due to diseased cotton, the ginning laborers suffer from skin diseases | रोगट कापसामुळे जिनिंगच्या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले

रोगट कापसामुळे जिनिंगच्या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासले

Next
ठळक मुद्देकाम करण्यास मजुरांचा नकार : जिनिंग संचालकांसमोर नवे संकट

प्रवीण खिरटकर ।
आॅनलाईन लोकमत
वरोरा : यावर्षी कापूस पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रार्दुभाव झाला. त्यामुळे कापसाचे उत्पादन फार कमी झाले. त्यानंतरही कापसावरील संकट थांबता थांबत नसून सरकीमधून निघणाऱ्या तेलातही बोंड अळीने शिरकाव केला आहे. परिणामी तेलाचे उत्पन्न कमी होवून ढेपही निकृष्ठ दर्जाची झाली आहे. आता जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगारांना रोगट कापसामुळे खाज सुटू लागल्याने मजुर त्रस्त आहेत. त्यामुळे अनेक जिनिंग मजुरांअभावी बंद ठेवाव्या लागत असल्याने जिनिंग संचालकासमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही या नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
वरोरा परिसर हा मुख्य कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जातो. वरोरा परिसरात चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीस आणत असल्याने अनेकांनी जिनिंग व्यवसाय सुरू केला.
गतवर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र कापूस पिकावर बोंड अळीने आक्रमण केल्याने अनेकांना उत्पन्न कमी झाले.
कापसाचे दर वाढेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात भरुन ठेवला. मात्र बोंडअळीग्रस्त कापूस घरात असल्याने कुटुंबियास त्वचा रोगाने ग्रासले आहे. मात्र उन्हाळा सुरू झाल्याने कापसाच्या वजनात घट होईल, या भीतीने अनेक शेतकरी सध्या मिळत असलेल्या दरात कापूस विकायला सुरूवात केली आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वाढली आहे.
कापसाची उचल करून जिनिंग करण्याच्या कामात शेकडो मजूर रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र या मजुरांना त्वचा रोगाने ग्रासल्याने मजूर घाबरून आहेत. त्यांना वैद्यकीय उपचार करण्याकरिता वेळ व पैसाही लागत असल्याने अनेक मजूर जिनिंगमध्ये काम करण्यास नकार देत आहे. परिणामी जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पडून आहे.
मागील दहा वर्षांपासून मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील मजूर घेवून जिनिंगमध्ये कापसाचे काम करीत आहे. परंतु अशाप्र्रकारचा त्वचा रोग कधीही बघितला नाही. त्वचेच्या आजाराने मजूर त्रस्त आहेत. उन्ह वाढल्यास मजुरांना खाजेचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याने ते कामावर येत नाही. काही मजुरांनी काम सोडले. उपचार करण्याकरिता मजुरांजवळ पैसे नसल्याने ते कामावर येत नाही. त्यामुळे जिनिंगचे काम संथगतीने सुरू आहे.
- धर्मेश वर्मा, मजूर कंत्राटदार.

घरातील प्रत्येक व्यक्तीला त्वचा रोगाने ग्रासले आहे. लहान मुलेही यामधून सुटली नाही. त्यामुळे तातडीने कापूस विकावयास घेवून आलो.
- संदीप देविदास रोडे
शेतकरी, गोरज

कापसामुळे खाज सुटत असल्याने मजूर रुग्ण उपचारासाठी येत आहेत. त्यांना गोळ्या दिल्या जात आहे. रुग्णांची संख्या वाढल्यास त्यांच्या औषधाची व्यवस्था रुग्णालयात करता येईल. नेमकी ही खाज कशामुळे सुटते ते तपासावे लागेल.
- डॉ. पी. टी. पंचभाई,
वैद्यकीय अधीक्षक, वरोरा.

सध्या शेतात असलेल्या कापसात अळ्या पडल्याने कापूस वेचणी करणारे मजूर खाजेमुळे २० रुपये प्रति किलो वेचणी करीत आहेत. जिनिंगमध्ये या कापसाला भाव नाही. वेचणी व जिनिंगमध्ये आणण्याचे वाहन भाडे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नसल्याने शेतातील कापूस वेचू नये.
- अमोल मुथा, संचालक, पारस जिनिंग, वरोरा.

Web Title: Due to diseased cotton, the ginning laborers suffer from skin diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.