दुष्काळाने घटलेली किंमत पावसाने वाढली
By admin | Published: July 11, 2016 12:56 AM2016-07-11T00:56:10+5:302016-07-11T00:56:10+5:30
तालुक्यात दमदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. शेती कामासाठी पाऊस पुरेसा असला तरी शेतबांध्या भरल्याने कामांना अडचण होत आहे.
रविवार बाजारात बैलांचा अभाव : बैलजोड्यांची किंमत ५० हजारांच्या वर
ब्रह्मपुरी : तालुक्यात दमदार पावसाने पेरणीला वेग आला आहे. शेती कामासाठी पाऊस पुरेसा असला तरी शेतबांध्या भरल्याने कामांना अडचण होत आहे. अश्यात काही भागात शेतकामासाठी बैलजोड्या मिळत नसल्याने व वेळेवर ट्रॅक्टर उपलब्ध होत नसल्याने, बैलजोडयांची आवक कमी झाल्याने किंमत वाढलेली असल्याचे ब्रह्मपुरीच्या रविवारच्या बैलबाजारात दिसून आले. एरव्ही दुष्काळाने बैलाची महत्त घटवले होते परंतु पावसाने किंमत वाढविली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी येथील बैलबाजार सर्वाधिक उलाढालीचे केंद्र आहे. रविवारी भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजारात पवनी, भुयार, चिमूर, सिंदेवाही, नागभीड, आरमोरी, वडसा अशा विविध ठिकाणाहून बैल येत असतात. ब्रह्मपुरी येथील बैलबाजार हा मुख्यत: बैलजोडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याची मागणीसुद्धा सर्वदूर होती. आजूबाजूच्या ठिकाणावरून अनेक व्यापारी व दलाल बैलजोडी खरेदी, विक्रीसाठी येत असतात. परंतु पावसाने जोरदार सुरवात केल्याने शेती मशागतीसाठी वेग आला आहे. एरव्ही ३० ते ३५ हजार रुपयांना मिळणारी जोडी आजच्या बाजारात ५० हजारांच्यावर गेल्याने पावसाने किंमत वाढविलेली आहे. मात्र अनेक दावणींना बैल बांधल्या नसल्याने दावण्या सुनाट आहेत. मागील वर्षी पावसाची कमतरता होती. त्यामुळे गेल्या महिन्यात बैल बाजारात शेतकरी व व्यापाऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणात येत होता. तसेच बैलांची आवक असल्याने बैल खरेदीसाठी भावही आटोक्यात होते.
परंतु यंदाच्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याने बैलजोडीची मागणी वाढलेली आहे. (तालुका प्रतिनिधी)
खिलार बैलजोडीचा अभाव
शंकरपटावर निर्बंध आल्याने अलीकडे बाजारात खिलार बैलजोडीचा अभाव आढळून येत आहे. या भागात अनेक शंकरपट प्रसिद्ध होत्या. त्या पूर्ववत झाल्यास अश्या बैलजोड्यांचा बाजारात वावर वाढून बाजारपेठ पुन्हा फुलू शकते अशी शक्यता वर्तविल्या जात आहे.