सिंदेवाही तालुक्यावर दुष्काळाचे सावट
By admin | Published: August 24, 2014 11:24 PM2014-08-24T23:24:59+5:302014-08-24T23:24:59+5:30
पावसाने दांडी मारल्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
सिंदेवाही : पावसाने दांडी मारल्यामुळे यंदा तालुक्यातील शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. संपूर्ण तालुक्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात मृग नक्षत्रासह दीड महिना पाऊस आला नाही. पावसाची झड सुरू झाल्यानंतर पेरणी करण्यात आली.
पुन्हा पाऊस बंद झाल्याने उगवलेले धान पऱ्हे पाण्याअभावी वाळून गेले. त्यानंतर दुबार तर काही भागात तिबार पेरणी करण्यात आली. काही प्रमाणात पाऊस आल्याने रोपटे तयार झाले व शेतकऱ्यांनी आर्थिक बाबीचा विचार न करता खासगी कर्ज घेऊन मशागत केली. परंतु १५ दिवसांपासून कडक ऊन तापत असून तयार झालेले पऱ्हे सुकू लागले आहेत. तालुक्यात ५० टक्के रोवणीसुद्धा झाली नाही. तालुक्यात ३० हजार हेक्टरमध्ये धानाची पिके घेतली जातात. त्यामध्ये पन्नास टक्के रोखणी झाली आहे. पण जी रोवणी झाली, ते रोपटेसुद्धा वाळून जात आहे. त्यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. तालुका दुष्काळग्रस्त असून नुकत्याच जाहीर झालेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये सिंदेवाहीचे नाव नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तालुक्यातील लोकप्रतिनिधींना तालुका दुष्काळग्रस्त करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. येथील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. अशीच परिस्थिती राहिली तर, या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ११ तालुक्याला न्याय देण्यात आला. पण सिंदेवाही चिमूर, ब्रह्मपुरीला वगळण्यात आले. या तालुक्यात दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी लोकप्रतिनिधींनी वेळीस लढा उभारावा, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)