अतिक्रमणामुळे चराईचे क्षेत्र घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 10:47 PM2018-08-28T22:47:22+5:302018-08-28T22:48:09+5:30
तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पोंभूर्णा : तालुका परिसरातील अनेक गावांमध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण वाढत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. शेकडो शेतकरी चारा टंचाईमुळे पाठीव जनावरांची विक्री करीत असल्याने गोधनात मोठी घट होत आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील गावांमध्ये चराईसाठी काही वर्षांपूर्वी शासनाने राखीव जमीन ठेवली होती. पण राजकीय नेत्यांनी पदाचा गैरवापर केला. संबंधित विभागाच्या अधिकाºयांना हाताशी धरून आर्थिक व्यवहार केले. शासकीय जमिनीवर वडिलोपार्जित कुठलेही अतिक्रमण नसताना बोगस पट्टे तयार करून बांबू व इतर झाडांची कत्तल केली. त्या जागेवर ट्रॅक्टरद्वारे धानशेतीच्या बांध्या तयार केल्या. चराईचे क्षेत्र नष्ट केल्याने शेतकºयांना जनावरे चराईसाठी कुठे न्यावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी गाय, म्हैस, शेळी अन्य पाळीव प्राणी पालन करतात.
यातून शेतकऱ्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत मिळत होती परंतु या जनावरांना चारण्याकरिता आता जागाच शिल्लक नाही. चराईचे क्षेत्र नष्ट करून त्यावर शेती केली जात आहे. आधीच सततच्या नापिकीमुळे धानपिकाचे पुरेसे उत्पादन होत नाही. जनावरांना चाऱ्यासाठी मिळणारी तणससुद्धा मिळणे दुरापास्त झाले. तालुक्यातील अनेक गावांमध्ये चाऱ्याअभावी पशुपालक शेतकरी हैराण झाले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव जनावरांची विक्री केल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील पाच वर्षांचा तुलनात्मक विचार केल्यास आजमितीस अनेक ेगावांतील जनावरांमध्ये मोठी घट झाली.