अतिक्रमणाच्या विळख्यात नाला अदृष्य
By admin | Published: April 10, 2017 12:47 AM2017-04-10T00:47:43+5:302017-04-10T00:47:43+5:30
देलनावाडी प्रभाग क्र. ४ मधील वाही नाला सध्या अदृष्य स्वरूपात दिसेनासा झालेला आहे.
वाही नालाप्रकरण : चोर सोडून सन्याशाला फाशी
ब्रह्मपुरी : देलनावाडी प्रभाग क्र. ४ मधील वाही नाला सध्या अदृष्य स्वरूपात दिसेनासा झालेला आहे. स्वत:च्या लाभासाठी नाल्याचा वापर करुन अतिक्रमणाच्या विळख्यात नाला सापडला आहे.
ब्रह्मपुरी शहर चारही बाजूने विस्तारले आहे. सर्वसामान्य नागरिकांनी लाखो रुपये खचर करुन जमिनी विकत घेतल्या आहेत. व आपल्या सुनियोजित जागेत घरे बांधली आहेत. परंतु काही मोजक्या व नामांकित लोकांनी वाही नाल्याचा चेहरामोहराच बदलविला आहे. वाही नाल्यावर अतिक्रमण कित्येक वर्षापासून सुरु असून प्रशासन मुंग गिळून चूप कसा आहे किंवा कोणत्या दबावाखाली येत आहे हा सध्या प्रश्न निर्माण झालेला आहे. पूर्वी जेव्हा लेआऊट बनले नव्हते, तेव्हा नाल्याला पूर येऊन वाहतूक खोळंबत होती. आता तर पूर सोडून साधे पाणी वाहणेसुद्धा खोळंबले आहे. शहरात नाल्यासमवेत जागोजागी अतिक्रमण करणे सुरु आहे व यापूर्वी झाले आहे. त्याकडे कानाडोळा केला जात आहे. हे शहराच्या विकासाचे योग्य लक्षण नसल्याचे दिसून येत आहे. सामान्य नागरिकांना अतिक्रमण नाल्या, रस्ते आदी सुविधा योग्य पद्धतीने पाहिजे आहे. पण त्यांच्या या मागणीकडे कोणीच वाली उरला नसल्याने अतिक्रमणधारकांचे आणि नाल्या, रस्ते बनविणाऱ्याचे गोरखधंदे फोफावले आहेत. एखाद्याच्या मर्जीने प्रशासन चालत असेल, तर त्याला कुठेतरी रोखले पाहिजे अन्यथा चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचे कार्य सध्यातरी सुरु असल्याचे दिसून येत आहे. देलनवाडी नाला अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याने नाल्यावर सोयीच्या रुम तयार करण्यात जाणकार नागरीक तरबेज आहेत. (तालुका प्रतिनिधी)