कराच्या थकबाकीमुळे ग्रामविकासाला खीळ
By admin | Published: April 10, 2015 12:54 AM2015-04-10T00:54:57+5:302015-04-10T00:54:57+5:30
येथील काही उद्योगांकडे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे.
चिमूर : येथील काही उद्योगांकडे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा कर थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीचे उदासिन धोरण यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.
चिमूर येथील एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या शारदा अंबिका पॉवर प्लॉन्टकडे चिमूर ग्रामपंचायतीचा मालमत्ता व इतर कर असे मिळून ३१ मार्चअखेर नऊ लाख १० हजार रुपये थकबाकी आहेत कंपनी व्यवस्थापन कर भरण्यासाठी सहकार्य करीत नसल्याने गाव विकासाला अडसर ठरणाऱ्या अशा उद्योगांची गरजच काय, अशी भावना सर्वत्र निर्माण झाली आहे.
१० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या शारदा अंबिका पॉवरप्लॉन्ट या खासगी वीज निर्मिती प्रकल्पाच्या व्यवस्थापनाकडून सुरूवातीपासूनच कर भरण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. सदर कंपनीकडे ग्रामपंचायतीचे सन २०१३-२०१४ च्या करापोटी सात लाख ८० हजार रुपये थकबाकी असून नुकत्याच संपलेल्या सन २०१४-१५ या आर्थिक वर्षाचे एक लाख ३० हजार असे एकूण ९ लाख १० हजार रुपये थकीत असल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होत आहे. यामुळे गावातील विकास योजना व इतर कामे करण्यासाठी अडचणीचे ठरत आहे.
घर, उद्योग, दुकान व इमारतीवरील मालमत्ता कर हे ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्त्रोत असते. त्यातुनच गावाच्या विकासाचे नियोजन केल्या जाते.
गेल्या सहा-सात वर्षांपासून चिमूर येथील एम.आय.डी.सी. परिसरात ेशारदा अंबिका पॉवर प्लॉन्ट नावाचा कचऱ्यापासून वीज निर्मिती कराणारा प्रकल्प कार्यान्वित आहे. या परिसरात असलेल्या इमारती व पॉवर प्लॉन्टच्या जागेवर ग्रामपंचायतीच्या नियमानुसार कर आकारणी केली आहे. या कंपनीकडे ३१ मार्चपर्यंत नऊ लाख १० हजार रुपये थकीत असून ग्रामपंचायतीच्या कर वसुलीसाठी कंपनीकडून कोणतेही सहकार्य केले जात नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने व्यवस्थापनाकडे सातत्याने मागणी बिल व पत्रव्यवहार करुन देखीलही योग्य प्रतिसाद मिळत नाही. पॉवर प्लॉन्टच्या धुरामुळेही चिमूर शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जात आहे. या संदर्भाच्या स्वतंत्र तक्रारी संबंंधित विभागाकडे केल्याचे ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्याने सांगितले.सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायतीमध्ये दाखले, कर आकारणी, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र घेण्यास गेले असता आदी कर भरा तेव्हाच दाखले, प्रमाणपत्र देण्यात येईल, असे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात येते. शारदा अंबिका पॉवर प्लॉन्ट कंपनीकडे नऊ लाख १० हजारांचा कर थकीत असताना ग्रामपंचायत प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (शहर प्रतिनिधी)