अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल

By admin | Published: March 9, 2017 12:43 AM2017-03-09T00:43:30+5:302017-03-09T00:43:30+5:30

मंगळवारी चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागातील शेतात गारांचा खच पडला.

Due to incessant rains, the farmers are ineligible | अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल

अवकाळी पावसामुळे शेतकरी हतबल

Next

भाजीपाला पिकांचीही नासाडी : हजारोे हेक्टरवरील शेतपीक उद्ध्वस्त; शेतकऱ्यांनी करावे काय ?
चंद्रपूर : मंगळवारी चंद्रपूर तालुक्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. अनेक भागातील शेतात गारांचा खच पडला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील हाताशी आलेल्या रबी पिकांना जोरदार फटका बसला. भाजीपाला पीकही उद्ध्वस्त झाले. यात शेतकऱ्यांची लाखोंची हानी झाली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी परिसरातील हजारो हेक्टरमधील शेतपिकांची नासाडी झाली. यात गहू, हरभरा मुंग, उडद, मिरची, कापूस व भाजीपाल्यांचा समावेश आहे. शेतीच्या नुकसानीने शेतकरी पूरता हवालदिल झाला आहे. मंगळवारी अचानकपणे ढगाळ वातावरण तयार झाले व विजेच्या कडकडासासह वादळी पाऊस व गारपीट झाली. तब्बल एक तास गारपीट झाल्याने शेतपिक जमीनदोस्त झाले. बल्लारपूर तालुक्यातील कोठारी, पळसगाव, कवडजई, काटवली, बामणी, मानोली, इटोली, आमडी, कळमना, परसोडी, कुडेसावली आदी गावातील हजारो हेक्टर शेतपिकाचे भयंकर नुकसान झाले. गहू, ज्वारी, तूर, मिरची पीक जमीनीवर लोटून गेले तर उभ्या झाडावरील मिरची तुटून खाली जमा झाली. वादळामुळे अनेक घराचे छपरे उडून गेले, कच्चे मकान व झोपड्या ढासळल्या. अनेक ठिकाणची झाडे उन्मळून पडली. रस्त्यावर गाराचा खच जमा झाला. कोठारीतील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्राजवळ आंब्याचे झाडे कोसळले. इलेक्ट्रीकच्या तारा तुटल्या. त्यामुळे गावात मंगळवारी रात्रभर अंधाराचे साम्राज्य होते. कोठारीतील श्रीधर मोरे व सुरेश कंदीकटीवार यांच्या शेतातील कुकुटपालनचे शेड पूर्णत: उडाले. त्यात शेकडो कोंबड्या ठार झाल्या.
राजुरा तालुक्यातील अनेक शेतातील पिकही क्षणार्धात डोळ्यादेखत गारीपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाले. हवामानाचा अंदाज अचानक बदलल्याने शेतकऱ्यांनी शेतमालाची सावरासावर करण्याआधीच शेतात होत्याचे नव्हते झाले. राजुरा तालुक्यातील नदीपट्यातील मानोली, बाबापूर, कालगाव, कढोली परिसराला पाऊस व गारपीटाचा चांगलाच तडाखा बसला. अकाली आलेल्या वादळी पाऊस व गारपीटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाजवळ आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढविण्याने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. गहू, हरभरा, ज्वारी, कापूस, तूर ही नगदी पिके क्षणार्थात जमिनदोस्त झाली. शेतकऱ्यांनी उसनवारी करुन मोठ्या मेहनतीने पिकांची लागवड केली होती. गहू, हरभरा, ज्वारी कापणीला आली असताना गारपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाली. मिरचीच्या झाडाला एकही मिरची शिल्लक राहीली नाही. शेतात पिकांचा पार सडा पडला होता. भूईसपाट झालेला शेतमाल पुन्हा हातात येईल याची कोणतीच शक्यता नाही. एवढा निसर्गाचा प्रकोप शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे.
बाबापूर येथील शेतकरी संतोष पारखी, मनोहर कायटोंगे, संजय गौरकार, रामदास करडभूजे, रमेश पिंपळशेंडे, चंद्रकांत पारखी, गोसाई नांदेकर, गोविंदा पारखी यांच्या शेतातील पिके पाऊस व गारपीटाच्या तडाख्याने भूईसपाट झाली. हातात येणारे पीक पूर्णत: उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा चुकायला लागला आहे. अचानक आलेले हे अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या आयुष्यावरच धाव घालणारे आहे.
चंद्रपूर आणि चिमूर तालुक्यातील व कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातील अनेक गावातही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. रबी पिकांचे मोठे नुकसान झाले. याशिवाय काही गावातील घरांची पडझड झाल्याचे वृत्त. शासकीय सर्वेक्षण अद्याप झालेले नसल्याने नुकसानीचा आकडा कळू शकला नाही. (लोकमत चमू)

नुकसानीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल
मंगळवारी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे जिल्हयातील बल्लारपूर, राजुरा व चिमूर या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिवीत हानीसुध्दा झाली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित अर्थसहाय्य देण्याचे निर्देश राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांना दिले आहेत. चिमूर तालुक्यातील कोलारी येथे तर बल्लारपूर तालुक्यातील बामणी येथे जिवीतहानीसुध्दा झाली आहे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे गहू, हरभरा आणि मिरची या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कोठारी येथे पशुधनाचे तसेच घरांचेसुध्दा नुकसान झाले आहे. बल्लारपूर तालुक्यात रब्बी हंगामातील पिकांचे पेरणी क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधीत झाले आहे. या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य प्रदान करण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

खरिपातही नुकसान अन् रबीलाही फटका
यंदा निसर्ग शेतकऱ्यांवर चांगलाच कोपल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. बऱ्याच शेतकऱ्यांनी जिवाचा आटापिटा करून कसेबसे शेतपीक वाचविले. मात्र उत्पन्न कमी झाले. शेतमालाला भावही कमी मिळत आहे. त्यामुळे आता रबी तर खरिपात गेलेला तोल सावरणार असे शेतकऱ्यांना वाटत होते. शेतपिक हाताशीही आले होते. मात्र मंगळवारच्या अवकाळी पावसाने रबीलाही फटका बसला.
कोठारी, गडचांदुरात पुन्हा पाऊस
मंगळवारी जिल्ह्यातील अनेक गावाला अवकाळी पावसाने व गारपीटने झोडपले. त्यानंतर आज बुधवारी सकाळी उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही दुपारनंतर पुन्हा वातावरण बदलले. राजुरा तालुक्यातील कोठारी व कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरातही पुन्हा आजही अवकाळी पाऊस पडला. यात पुन्हा शेतकऱ्यांचेच नुकसान झाले.

हेक्टरी २५ हजारांची
नुकसानभरपाई द्या
निसर्गाच्या प्रकोपाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटले असून हातात आलेले पिक गारपिटीने उद्ध्वस्त झाले. या शेतपिकांची त्वरित पाहणी करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची नुकसान भरापाई देण्याची मागणी भारिप बमस चंद्रपूरचे जिल्हा महासचिव धिरज बांबोळे व शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Due to incessant rains, the farmers are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.