कापूस खरेदीअभावी जिनिंग पडल्या ओस
By admin | Published: November 23, 2015 12:58 AM2015-11-23T00:58:49+5:302015-11-23T00:58:49+5:30
जिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही.
प्रशासनाचे दुर्लक्ष : कोरपन्यातील कापसाची परजिल्ह्यात विक्री
जयंत जेनेकर कान्हाळगाव
जिल्ह्यातील कापूस व कृषी शेतमालाची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या कोरपना येथे सीसीआय, पणन महासंघ किंवा खासगी पैकी एकाचीही कापूस खरेदी सुरू झालेली नाही. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध नाही. त्यामुळे येथील कापूस उत्पादकांना आपला कापूस कवडीमोल भावात खेडा खरेदीदारांना विकावा लागत आहे.
तालुक्यातील शेती ही पांढऱ्या सोन्यासाठी सर्व दूर परिचित आहे. परंतु, यंदा झालेल्या अकाली पावसाने कापूस उत्पादकांना जबर तडाखा बसला. कसे-बसे सावरुन त्याने दुबार पेरणी केली. मात्र तो आर्थिकदृष्ट्या खंगला गेला आहे. यातच आता कोरपन्याचे कापूस संकलन केंद्रही सुरू न झाल्याने दूर अंतरावर असलेल्या वणी, राजुरा, आसिफाबाद येथील बाजारपेठेत कापूस विकण्यासाठी न्यावा लागत आहे. यामध्ये आधीच कापसाला असलेला अल्पभाव व मालवाहक खर्च शेतकऱ्यांच्या दृष्टीने न पेलवणारा आहे.
१० दिवसांपूर्वी पणन महासंघातर्फे कोरपन्यात कापूस खरेदी करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात अद्यापही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे येथील जिनिंग ओस पडल्या आहेत. आजघडीला शहरात एक सहकारी व दोन खासगी जिनिंग आहे. परंतु, अर्धा हंगाम जाऊनही खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे खरेदी सुरू होईल की नाही, याबाबत आजही साशंकताच आहे. शेजारच्या राजूरा तालुक्यात उत्पादन कमी असूनही सीसीआयतर्फे खरेदी सुरू करण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी विक्रमी उत्पादन असतानाही प्रशासनाच्या वतीने बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात आली नाही. यात कापसाचाही भाव कमी-जास्त होत असल्याने खेडा खरेदीदारांना चांगलेच सुगीचे दिवस शेतकऱ्यांच्या विवंचनेपोटी आले आहे.
अनेक शेतकरी पणन मार्फत कापूस विक्रीला अनउस्तुक आहे. तालुक्यात मागील वर्षी सीसीआयतर्फे कापूस खरेदी करण्यात आली होती. यात ५० हजारापर्यंत विक्रमी कापूस खरेदी करण्यात आला. मात्र यंदा खरेदी न करण्यामागे कोणते कारण आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. सद्यस्थितीत या भागातील शेतात कापसाला मोठा बहार आला आहे. परंतु, मजुरांची संख्या अत्यल्प असल्याने कापसाचे रान तयार झाले आहे. यातही हवामानाच्या बदलत्या अंदाजाने शेतकरी चिंतेत अडकला आहे. आज कधी नव्हे एवढे मजूर इतरत्र ठिकाणावरुन कोरपन्यात दाखल झाले आहे. यात मराठवाडा, उमरखेड, हिमायतनगर, सावली, सिंदेवाही, तेलंगणातील बेला, जैनत, मूल, पोंभूर्णा, जीवती, गोंडपिपरी, नागभीड भागातील मजुरांचा समावेश आहे. मात्र हेही मजूर आजघडीला कमी पडत आहे. यामध्येही वेचणीचे वाढलेले भाव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या तंगवणारे ठरत आहे.
जिल्ह्यात राजुरा, वरोरा, माढेळी येथे कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. कोरपण्यात असलेल्या अवकाशामुळे शेतकरी खरेदीला सुरुवात केव्हा होईल, अशा चर्चा सुरू आहेत. याबाबत स्थानिक बाजार समितीच्या वतीने वरिष्ठांना अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आले. परंतु, खरेदीला सुरुवात झाली नाही. त्यामुळे आठवड्यात खरेदीला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.