आर्थिक पाठबळाअभावी महिला बचतगटांची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 10:48 PM2018-07-11T22:48:40+5:302018-07-11T22:49:15+5:30
चंद्रपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली़ परंतु, मनपा प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो महिलांनी बचत गटाची स्थापना केली़ परंतु, मनपा प्रशासनाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. तर दुसरीकडे महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तुंना विक्रीची व्यवस्था नसल्याने संकटांचा सामना करावा लागत आहे़
शहरातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या दुर्बल समाज घटकातील महिलांना बचत गटाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले होते. बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक स्थिरता मिळाल्यास सामाजिक प्रश्न कायमचे सुटू शकतात़ शिवाय लोकशाही समाजव्यवस्थेमध्ये आपले न्यायहक्क प्राप्त करण्यासाठी या बचतगटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे शासनाने बचतगट स्थापन करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये बचतगटांची स्थापना झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमाने विविध योजनांची काही प्रमाणात अंमलबजावणी झाल्याने महिलांमध्ये जागृती वाढत आहे. या जागृतीमुळेच नागभीड तालुक्यातील चिंधीचक येथील महिला बचतगटाला यंदाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला. परंतु चंद्रपूर शहरातील विविध प्रभागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या बचतगटांची परिस्थिती निराशाजनक असल्याचे दिसून येत आहे. महिलांनी बचतगट स्थापन केले पण स्वयंरोजगार व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी कोणतर व्यवसाय उभारावा, याबाबत त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
मनपाने सुरूवातीला महिला बचतगटांना मार्गदर्शन करून विविध योजनांची माहिती दिली. त्यामुळे बचतगटांची संख्या वाढली. पण अजुनही मोठा उद्योग उभारता आला नाही. बचतगटातील महिलांना स्वयंरोजगार मिळविणे कठीण जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक कल्याणाच्या योजना राबविताना महिला बचतगटांना प्राधान्य देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले़ मात्र शहरातील बचतगटांना आर्थिक लाभाच्या योजनांची माहिती दिलीच जात नाही, असा आरोप महिलांनी केला आहे.
प्रशिक्षणाचा अभाव
महिला बचत गटांना लोकशाही व्यवस्था, पंचायतराज, सामाजिक न्याय, शासनाचे विविध योजना तसेच प्रबोधनपर विविध पैलुंची माहिती देण्यासाठी कक्ष तयार केले होते. बचतगटातील महिला प्रशिक्षित झाल्या तर त्या आर्थिक प्रगती करण्यासाठी पुढे येऊ शकतील. हा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू होता. मात्र मनपाने महिला बचतगटांना प्रशिक्षित करण्याचे काम गुंडाळून ठेवले. परिणामी, शेकडो योजना असूनही या योजनांचा महिला बचतगटांना लाभ घेता येत नाही.
विक्रीची व्यवस्था नाही
बाबूपेठ, सुमित्रानगर, बालाजी वॉर्ड, तुकूम, भिवापूर तसेच अन्य काही वॉर्डातील महिलांनी गृहोपयोगी वस्तू तयार करण्याचे काम सुरू केले. बचतगटांद्वारे उभारण्यात आलेल्या हा व्यवसाय विस्तारीत होउ शकतो. प्रशासनाने त्या बचतगटांनी तयार केलेल्या मालास विक्रीची व्यवस्था करून दिली नाही त्यामुळे लाखो रूपयांचे साहित्य पडून आहे. व्यवसाय उभारल्यानंतर मालाची विक्री कशी करावी याचे ज्ञान महिलांनी मिळविले पण पायाभूत सुविधा नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बँकांकडून अडवणूक
महिला बचतगटांना व्यवसाय उभा करण्यासाठी बँकाकडून कर्ज मिळत नाही. मनपाने प्रारंभी बँक आणि बचतगटांमध्ये समन्वयाची भुमिका घेतली होती. परंतु सद्यस्थितीत याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक महिला बचतगटांना कर्जासाठी नकार देतात. भांडवलच नसेल तर व्यवसाय कसा उभा करावा, असा प्रश्न महिला विचारत आहेत.