आंब्याची आवक घटल्याने चव महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:18 PM2018-04-21T23:18:38+5:302018-04-21T23:18:38+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्याची चव घेण्यासाठी सर्वच आतूर असतात. बाजारात विविध प्रजाती व किमतीचे आंबे अगदी स्वस्त दरात मिळत होते. मागील हंगामाचा विचार केल्यास यंदा फळांची आवक कमी असल्याने ग्राहकांना पंसतीचे आंबे मिळणे कठीण झाले आहे.
गेल्यावर्षी दशहरी, बेगनपल्ली, गावराणी आंब्यांनी शहरातील बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र, यंदा बेगनपल्ली आंब्याव्यतिरिक्त अन्य अन्य प्रजातींची फळे आली नाहीत. मागील वर्षी दशहरी व अन्य आंबे ६० ते ७० रुपये आणि अखेरीस ३० रुपये किलो दराने मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले होते. त्यामुळे ग्राहकांना चव चाखता आली. परंतु, यंदा अजूनही बाजारात विविध प्रकारचा आंबा मुबलक व वाजवी दराने उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांना खरेदी करण्यासाठी विचार करावा लागत आहे. सध्या बेगनपल्ली हा एकमेव आंबा बाजारात कमी प्रमाणात दिसत आहे. पण, त्याचाही भाव २०० रुपये किलोच्या घरात आहे. सुरुवातीला शहरात बेगनपल्ली, दशेरी व लालबाग व हापूस आंबे मोठ्या प्रमाणात नागपूर व अन्य ग्रामीण भागातून बाजारपेठातून येत होते. पण, यावर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने आंब्याची आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे.
वादळी तडाख्याचा परिणाम
बेगनपल्ली आंब्याचा रस मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर केला जातो. कमी किमतीने उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्यांना परवडण्यासारखे असते. यावर्षी त्याचाही दर १५० ते २०० रुपये किलो आहे. पण, मागणीप्रमाणे पुरवठा नाही. त्यामुळे आंब्याची चव महागली आहे. मे महिन्यात आवक वाढल्यास सर्व प्रकारचे आंबा उपलब्ध होऊ शकतात. वादळी तडाख्याने आवक कमी असल्याची माहिती विक्रेत्यांंनी दिली.