पाण्याअभावी अस्वच्छतेने रूग्ण त्रस्त
By admin | Published: June 26, 2014 11:10 PM2014-06-26T23:10:42+5:302014-06-26T23:10:42+5:30
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आज गुरूवारी सकाळच्या सुमारास भेट दिली असता, वार्डातील नळाचा पाणी पुरवठा बंद झाला होता. परिणामी शौचालय व बाथरूम
वास्तव जिल्हा रूग्णालयाचे : खाटांची कमतरता
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात आज गुरूवारी सकाळच्या सुमारास भेट दिली असता, वार्डातील नळाचा पाणी पुरवठा बंद झाला होता. परिणामी शौचालय व बाथरूम परिसरात अस्वच्छता पसरली होती. रूग्णालयालगत असलेल्या नातेवाईकांच्या धर्मशाळा परिसरात प्रचंड घाण पसरली असल्याचे दिसून आले. एकूणच डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे यामुळे रूग्णांकडे होणारे दुर्लक्ष व घाणीचे साम्राज्य यामुळे रूग्णांची हेळसांड होत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.
प्रसुती वार्डात कार्यरत प्रसुती तज्ज्ञांकडून रूग्णांची तपासणी दुपारी १ वाजतानंतरही सुरू होती. यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आणलेले अनेक डब्बे बाहेरच ठेवावे लागले. हे चित्र नेहमीचेच आहे. येथील कार्यरत डॉक्टर उशीरा येऊन तपासणीचा राऊंड सुरू करीत असल्याने रूग्णांसह नातेवाईकांनाही त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेक नातेवाईकांनी यावेळी सांगितले. दुपारी १ वाजतानंतरही प्रसुती वार्डाचे प्रवेशद्वार बंद होते. यामुळे नातेवाईकांची प्रवेशद्वाराजवळ प्रचंड गर्दी झाली होती. नातेवाईकांसाठी रूग्णालयाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीतून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. लगतच नालीही आहे. सदर नालीत प्रचंड घाणीने तुडुंब भरली आहे. तर दुसरी नालीचा उपसा करण्यात आला. तो उचलण्यात आला नाही. यामुळे घाणीच्या साम्राज्यातच नातेवाईक पिण्याचे पाणी बॉटलमध्ये घेऊन जात असल्याचे वास्तव दिसून आले. रूग्णालयाच्या पायऱ्यांवर अस्वच्छता होती. कर्मचाऱ्याअभावी नातेवाईकांनाच व्हिलचेअर बसवून सोनोग्राफीसाठी रूग्णाला न्यावे लागले.