नव्या आदेशामुळे आचारसंहितेतून दिलासा
By admin | Published: October 21, 2016 01:04 AM2016-10-21T01:04:24+5:302016-10-21T01:04:24+5:30
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती.
आचारसंहिता केवळ निवडणूक क्षेत्रातच: आयोगाचे नव्याने आदेश
चंद्रपूर : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली होती. मात्र १९ आॅक्टोंबर रोजी नव्याने आलेल्या आदेशानुसार आता आचारसंहितेचा प्रभाव केवळ निवडणूक क्षेत्रापुरताच मर्यादित राहणार आहे. या नव्या आदेशामुळे पुढारी आणि अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
नव्या निर्देशानुसार ज्या नगर परिषद क्षेत्रात निवडणूक आहे, त्याच क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार आहे. त्या परिसरातील क्षेत्रात आचारसंहिता लागू राहणार नाही. परंतु नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर काम करताना शेजारच्या नगर परिषद क्षेत्रातील मतदारावर कोणताही प्रभाव पडणार नाही, असे कोणतेही कृत्य करण्यात येऊ नये, असे निर्देशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. नगर परिषद क्षेत्राच्या बाहेर लागून असलेल्या ग्रामीण भागात सरकारला नवीन रस्ते, जलयुक्त शिवार, पाणी पुरवठा योजना इत्यादी कामे करता येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसह एक नवनिर्मीत नगर पंचायतीसाठी निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. इतर निवडणूकांप्रमाणेच या निवडणूकीतही आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी गुरूवारी झालेल्या बैठकीत दिल्या. यंत्रणांनी आचारसंहिताभंगची घटना कुठे घडणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, अतिरीक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक सिरसे, उपजिल्हाधिकारी अजय रामटेके, उपजिल्हाधिकारी विकास हरखंडे, अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक हेमराजसिंग राजपुत, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राजूरा, मूल, बल्लारपूर व वरोरा या चार नगरपरिषदेची व नवनिर्मिती नगर पंचायत सिंदेवाहीची निवडणूक जाहीर झाली असून २७ नोव्हेंबरला मतदान, तर २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. संबंधित नगरपरिषद क्षेत्रात १७ आॅक्टोंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचे पालन योग्यपणे व्हावे, यासाठी ही बैठक घेण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)