शुल्क न भरल्याने सराव परीक्षेपासून वंचित
By Admin | Published: February 8, 2017 02:01 AM2017-02-08T02:01:14+5:302017-02-08T02:01:14+5:30
पहाडावरील गोरगरीबांच्या मुलांना इंग्लीश मिडीयमचे धडे गिरविता यावे, त्यांना इंग्रजी वाचता व लिहिता
जिवती येथील इंग्लीश मिडीयम स्कूलमधील प्रकार : ट्युशन फीच्या नावावर पालकांची लूट
शंकर चव्हाण जिवती
पहाडावरील गोरगरीबांच्या मुलांना इंग्लीश मिडीयमचे धडे गिरविता यावे, त्यांना इंग्रजी वाचता व लिहिता आणि बोलता यावी यासाठी जिवती येथे मिशनरी (ख्रिच्छन) अंतर्गत संथ थॉमस इंग्लीश मिडियम स्कूल चालू करण्यात आले. मात्र येथील संस्थाचालक व व्यवस्थापकाच्या मनमानी कारभारामुळे शाळेचे शिकवणी शुल्क व स्कूल बस शुल्क वेळेवर भरले नाही म्हणून १६ ते १७ विद्यार्थ्यांचा चक्क वर्गाबाहेर काढून सराव परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी या मिशनरी शाळेत बघायला मिळाला.
या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन या इंग्लीश मिडियम शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालक वर्गानी केली आहे. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद मराठी शाळेकडे दुर्लक्ष करीत इंग्रजी शिकवणाऱ्यांसाठी खाजगी शाळांमध्ये शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र या शाळांचे शुल्क अवाक्याबाहेर गेले आहे. सध्या चालू सत्रामध्ये नोटबंदीच्या निर्णयाने काहींना अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे शाळेचे शुल्क वेळेवर भरता आले नाही आणि हाच मुद्दा समोर करुन संथ थॉमस इंग्लीश मिडीयमच्या व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांना सराव परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा डाव रचला.
हा प्रकार आजच नाही तर नियमीत सुरु असते. पालक वर्गानी यावर विचारणा केली तर मुलांना शाळेतून काढण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे पालकवर्गही त्यांच्या मनाप्रमाणे वागतात. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकाची मनमानी कायम दिसत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.
क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून होते वाहतूक
विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी भरुन वाहतूक केली जाते. त्यात अनेक विद्यार्थी बसायला जागा नसल्याने पाटीवर दप्तर घेऊन उभेच राहतात. काही जणांना एकाच सिटवर तीन-चार विद्यार्थी बसतात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा त्रासही सहन करावा लागतो. याबाबत संबंधीत शाळेच्या मुख्याध्यापिका यांना विचारणा केली असता, यावर उत्तर देण्याचे टाळले व व्यवस्थापकाशी बोलण्यास सांगितले. मात्र व्यवस्थापकांनीही दूरध्वनी उचलला नाही.