चहाला पैसे न दिल्याने रुग्णाला रूग्णवाहिकेतून उतरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 10:50 PM2018-09-25T22:50:12+5:302018-09-25T22:51:36+5:30
चहापानाला पैसे न दिल्याने चक्क रुग्णालाच भर रस्त्यात रुग्णवाहिकेतून उतरवून दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी घडल्याची बाब येथे उघडकीस आली. सदर १०८ रुग्णवाहिका सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयाची होती. तालुक्यातील ताडाळा येथील रमेश कोंडु कोडापे (५५) यांच्या शरीरावर सुज आल्याने ते मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून चंद्र्रपूरला जाण्याचा सल्ला दिला.
भोजराज गोवर्धन।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चहापानाला पैसे न दिल्याने चक्क रुग्णालाच भर रस्त्यात रुग्णवाहिकेतून उतरवून दिल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी घडल्याची बाब येथे उघडकीस आली. सदर १०८ रुग्णवाहिका सिंदेवाही ग्रामीण रूग्णालयाची होती.
तालुक्यातील ताडाळा येथील रमेश कोंडु कोडापे (५५) यांच्या शरीरावर सुज आल्याने ते मूल उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून चंद्र्रपूरला जाण्याचा सल्ला दिला. आर्थिकस्थिती हलाखीची. खासगी वाहनाचा खर्च आवाक्याबाहेर होता. ही व्यथा त्यांनी सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांना सांगितली. झिरे यांनी १०८ क्रमांकाच्या वाहनाने चंद्रपूरला जाण्याचा सल्ला दिला. दुपारी १२ वाजता १०८ क्रमांकावर भ्रमणध्वनी करून रूग्णवाहिका पाठविण्याची विनंती केली. मूल, पोंभुर्णा, सिंदेवाही येथील रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. सदर रूग्ण मूल उपजिल्हा रूग्णालयात रुग्णवाहिकेची वाट पहात होता. सायंकाळी ५ वाजता सिंदेवाही येथील १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका (क्र. एमएच १४ सीएल ११५८) मूल येथे आली.
मूलला रुग्णवाहिका परत आणली
यावेळी रूग्णालयातील एका रूग्णासह रमेश कोंडु कोडापे या रूग्णालाही या रूग्णवाहिकेत बसविले. कोडापे यांच्यासोबत त्यांची पत्नी व शेजारी गणेश टेकाम हे होते. मूलपासून सुमारे ३ कि.मी. अंतरावर पोहचल्यानंतर रूग्णवाहीकेतील कर्मचाºयाने चहापानासाठी पैसे मागितले. पैसे नसल्याने रुग्णाने देण्यास नकार दिला. एवढ्यावरून चालकाने रूग्णवाहीका परत मूलला आणून भोयर यांच्या कॅन्टीनजवळ रुग्णाला उतरवून दिले.
सदर बाब रूग्णासोबत गेलेल्या गणेष टेकाम यांनी झिरे यांना दिली. ही माहिती रुग्णासोबत असलेले गणेश टेकाम यांनी उमेशसिंह झिरे यांना सांगितली.
झिरे यांनी परत १०८ वर संपर्क साधून संबंधित अधिकाºयांना सांगितली असता अर्ध्या तासात दुसरी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्वाही देण्यात आली. अखेर सावली ग्रामीण रूग्णालयाच्या रूग्णवाहीकेने रमेश कोडापे या रुग्णाला चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात पोहचून दिले. या घटनेने रुग्णवाहीका सेवेवरच प्रश्न लागले आहेत.
मोलमजुरीचे पैसे मिळाल्याने झाले भरती
मागील १० दिवसांपासून रमेश कोडापे हे आजारी होते. त्यांच्याजवळ पैसा नसल्याने ते रूग्णालयात जावून उपचार घेऊ शकत नव्हते. पत्नीला मोलमजुरीचे पैसे मिळाल्याने तिने त्यांना मूल उपजिल्हा रूग्णालयात आणले. चंद्रपूर जाण्याची पाळी त्यांच्यावर आली, तेव्हा शासकीय रूग्णवाहीकेत चहापानाच्या पैशासाठी उतरवून देण्यात आल्याने माणुसकी हरवल्याचा प्रत्यय त्यांना आल्याचा आरोप रुग्णाने केला आहे. यावरून रुग्णवाहिकेच्या सेवेवर प्रश्नचिन्ह लागले आहेत.
रूग्णच यायला तयार नव्हता
एका रूग्णाला चंद्रपूर नेण्यासाठी रूग्णवाहीका मूल येथील उपजिल्हा रूग्णालयातील गेली होती. रमेश कोडापे उपाचारार्थ चंद्रपूर येण्याचा आग्रह धरला. त्यामुळे त्याला रूग्णवाहीकेत बसविण्यात आले, काही अंतरावर गेल्यानंतर त्यांच्याकडील वैद्यकीय कागदपत्रे बघितले असता त्यांच्याकडे रेफर स्लिप नव्हती. ही माहिती त्यांना दिली. यामुळे ते चंद्रपूर येण्यात तयार नव्हते. मूल येथे पोहचवून देण्याचा आग्रह केला. यामुळेच रूग्णवाहिका मूल येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या मार्गावर सदर रूग्णाला सोडण्यात आले,
-डॉ. नितीन भैसारे, वैद्यकीय अधिकारी, १०८ रुग्णवाहिका.