पोषण अन्न घटकातून कुपोषणमुक्ती शक्य
By admin | Published: July 15, 2016 01:05 AM2016-07-15T01:05:03+5:302016-07-15T01:05:03+5:30
घरातील आनंदी वातावरण व्यक्तीवर अवलंबून आहे. यात आईची भूमिका महत्त्वाची आहे.
बी.बी. गजभे : बल्लारपुरात पोषण चळवळ कार्यशाळा
बल्लारपूर : घरातील आनंदी वातावरण व्यक्तीवर अवलंबून आहे. यात आईची भूमिका महत्त्वाची आहे. गरोदरपणात मातांनी आनंददायी जीवन जगावे. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घ्यावा. सुदृढ़ बाळाच्या जन्मासाठी आहार व पोषण, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पोषक अन्न घटकांच्या सेवनातून कुपोषण मुक्तीवर मात करता येते, असे प्रतिपादन संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे यांनी येथे बुधवारी केले.
बल्लारपूर येथील महिला व बाल विकास प्रकल्पाच्या वतीने राजमाता जिजाऊ माता-बाल पोषण व आरोग्य अंतर्गत पंचायत समितीच्या सभागृहात पोषण चळवळ कार्यशाळा बुधवारी पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे उपसभापती अनेकश्वर मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अॅड. हरिश गेडाम, माजी उपसभापती सुमन लोहे, गटविकास अधिकारी भुजंग गजभे, कोर्टीमक्ताचे सरपंच शकुंतला टोंगे, वैशाली पोतराजे (लावारी), सविता धोडरे (मानोरा), जीवनकला आलाम (किन्ही), बाल विकास प्रकल्प अधिकारी वंदना दुधाने यांची उपस्थिती होती.
दरम्यान, मातृ सुरक्षा दिन, गर्भ संस्कार, अतिरिक्त आहार, कुपोषण मुक्ती यावर उपस्थित पाहुण्यांचे मार्गदर्शन झाले.
प्रास्ताविकातून वंदना दुधाने यांनी कार्यशाळेची माहिती दिली. संचालन कल्पना देवगडे यांनी तर आभार शशिकला खिरटकर यांनी मानले. कार्यशाळेला तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)