पांदण रस्त्यांअभावी चिखलातून शेतीची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:55 AM2019-11-28T00:55:03+5:302019-11-28T00:55:20+5:30
मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : गोंडपिपरी तालुकातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये पांदण रस्त्यांचे बांधकाम न झाल्याने शेतकऱ्यांना शेतीकडे जाण्यासाठी संकटांचा सामना करावा लागत आहे. लाठी गावठान ते अंतरगाव शिवारात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पांदण रस्त्यावर चिखल झाला आहे. बैलगाडीसह शेतात जाण्याचा मार्ग बंद झाल्याने शेतकरी हतबल झाले.
लाठी परिसरातील जनता शेतीवरच उदरनिर्वाह करते. त्यामुळे शेतीशिवाय अन्य पर्याय नाही. खरीप हंगामातील पिके हाती येत आहेत. परंतु कापणी अथवा चुरणे केल्यानंतर गावात शेतमाल कसे आणायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला. पावसाळ्यात पांदण रस्त्याअभावी शेतीची कामे खोळंबतात.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन तातडीने पांदण रस्ता निर्माण करण्यास मंजुरी देण्याची मागणी सरपंच सुमन गेडाम, देवराव म्हरस्कोले, श्रीकृष्ण कोसरे व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
विकास योजना गेल्या कुठे?
मागील पाच वर्षांत विकासापासून वंचित असलेल्या लाठी परिसरातील अनेक गावांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्याच नाही. विकासाचे नियोजन करताना या परिसराकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे कृषी, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य,महिला व बालकल्याणाच्या योजनांपासून गरजु नागरिकांना वंचित राहावे लागत आहे. या परिसरातील शेतकरी पांरपरिक शेती करतात. परंतु, जिल्हा परिषद कृषी विभागाच्या योजना राबविण्यात गांभिर्याने प्रयत्न झाले नाही. त्याचे अनिष्ठ परिणाम, या भागातील शेतीवर झाले आहेत.
नुकसान भरपाईची प्रतीक्षा
खरीप हंगामातील पिके हाती येण्याच्या काळातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे लाठी, सरांडी, वामनपल्ली, पोडसा, सोनापूरसह अनेक गावांतील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था कोलमडली. खरीपातील लागवडीची खर्च निघेल की नाही, याचीच चिंता आहे. महसूल व कृषी विभागाकडून सर्वेक्षण केल्यानंतर शासनाने भरपाई जाहीर केली. परंतु, ती तुटपुंजी आहे. शिवाय, अद्याप अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही.
वन्य प्राण्यांच्या हैदोसाने शेतकरी हतबल
लाठी परिसरातील बहुतांश गावे वन परिसराला लागून आहेत. कापूस, सोयाबीन, धान, भाजीपाला आदींसह कडधान्याची पिके घेतली जातात. मात्र वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे पिके उद्ध्वस्त होत आहेत. पंचनामे करून भरपाई देण्यास विलंब होतो. कागदपत्र गोळा करण्यातच शेतकऱ्यांना विविध कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. नुकसानीच्या तुलनेत अल्प भरपाई मिळत असल्याने शेतकरी हैराण आहेत. वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून भरपाई तात्काळ देण्याची मागणी शेतकºयांनी केली.
पांदण रस्त्यांची समस्या यंदाच्या खरीप हंगामात अत्यंत त्रासदायक ठरली. या हंगामातील पीक काढल्यानंतर बैलगाडीने घरी आणता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे विकासाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी या प्रश्नांचा सतत पाठपुरावा करीत आहे.
-साईनाथ कोडापे, संचालक
कृषी उत्पन्न बाजार समिती, गोंडपिपरी