देयके अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम बंद
By admin | Published: February 23, 2016 12:37 AM2016-02-23T00:37:00+5:302016-02-23T00:37:00+5:30
शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे.
घनश्याम नवघडे नागभीड
शासनाकडून देयकेच अदा होत नसल्याने घोडाझरी उपकालव्याचे काम करणाऱ्या अनेक कंत्राटदार कंपन्यानी या कालव्याचे काम बंद केले आहे. परिणामी गेल्या तीन-चार वर्षापासून या कालव्याचे काम बंदच आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला आहे. सहा ते सात वर्षापूर्वी या कालव्याचे काम सुरु करण्यात आले होते. तत्पूर्वी या कालव्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहीतही करण्यात आली आणि काम धडाक्यात सरु करण्यात आले. हे काम करण्यासाठी मेंढा (किरमिटी) येथे एफएसी नवेगाव पांडव येथे एचसीसी, खैरीचक येथे बी.टी.पाटील आणि महालक्ष्मी तर कोदेपार एसएमएस या कंत्राटदार कंपन्यानी आपले युनिट सुद्धा सुरु केले. काही दिवस हे काम सुरळीत सुरु राहिले. पण नंतर शासनाने आपले हात आखडते घेणे सुरु केल्याने या कंत्राटदार कंपन्यासमोर मोठा बिकट प्रसंग सुरु झाला.
अशाही अवस्थेत काही कंपन्यानी काम सुरु ठेवले तर काही कंपन्यानी काम बंद केले. नवेगाव पांडव येथील एचसीसी या कंपनीने तर लाखो रुपये खर्च करुन उभारलेले युनिटच येथून हलविले. आता या बाबीस तीन ते चार वर्षाचा कालावधी होत आहे. दरम्यान राज्यात सत्तांतर झाले. भाजप-सेना युतीचे शासन राज्यात सत्तारुढ झाले. आता तरी या कालव्याचे मागे लागलेली साडेसाती संपेल, अशी अपेक्षा होती. पण नव्या शासन काळातही या कालव्याच्या नशीबी असलेला भोग संपले असे दिसत नाही. खरे तर या कालव्याचा नागभीड तालुक्यातील बहुतांश शेतीला सकृतदर्शनी काहीच लाभ होत नाही. नागभीड तालुक्यातील गेलेला हा कालवा पूर्णत: भूमिगत स्वरूपाचा आहे. पण मागेपुढे या कालव्याचे काम पूर्ण झालेच आणि येथून पाणी जाऊ लागले तर लिफ्ट इंरिगेशन सारखी योजना कार्यान्वीत होऊ शकते.
कंपन्यांची
अवस्था बिकट
कंत्राटदार कंपन्यानी काम बंद केले असले तरी काही कंपन्यांचे युनिट अद्यापही सुरु आहेत. खैरी चक आणि मेंढा (किरमिटी) येथील कंपन्याचे याबाबत उदाहरण देता येईल. पण शासनाकडून केलेल्या कामाचे देयके मिळत नसल्याचे या कंपन्यांची अवस्था अडकित्यामधील सुपारी सारखी झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ठरताहेत भार
खरे तर या कालव्याच्या देखरेखीसाठी सायगाटा, नागभीड येथे वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. कार्यकारी उपविभागीय अभियंत्यांच्या अनेक जागा भरण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या आहेत. पण कामच नसल्याने या वसाहती आणि नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी भूईला भार ठरत आहेत.