सणासुदीच्या आनंदात महागाईचे विरजण
By Admin | Published: November 9, 2015 04:58 AM2015-11-09T04:58:49+5:302015-11-09T04:58:49+5:30
जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. सणासुदीच्या
चंद्रपूर : जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे तोंडाचे पाणी पळाले आहे. सणासुदीच्या दिवसात घराघरात होणाऱ्या पक्वान्नात यंदा महागाईमुळे कडवटपणा आलेला आहे. गोडधोड पदार्थ तर सोडाच साधे वरणही २०० रुपये तूर दाळ झाल्यापासून जेवणातून बाद झाले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत भरमसाठ वाढ होत असल्याने जीवन कसे जगावे, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.
४० टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली कसेबसे जीवन जगत आहे. पाच टक्के जनता दिवसातून एक वेळ जेवण करीत आपल्या संसाराचा रहाटगाडा हाकत आहेत. सामान्य माणसांचे कंबरडे मोडावे अशी महागाई गगनाला जाऊन भिडलेली आहे. माणसाला आज जगावे की मरावे, असा प्रश्न पडला आहे. साखर, तेल, डाळ, भाजीपाला, तांदूळ, गहू तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे झालेले आहे. आधीच बेरोजगारीचे सावट असताना जीवनापयोगी वस्तुंचे भाव सामान्यमाणसाला परवडण्यासारखे नाही. ग्रामीण भागातून कामासाठी शहरात आलेल्या कुटूंबाची वाताहत कशी होत असेल, शहरात भाड्याने राहून मुलांचे शिक्षण, आरोग्य, त्यांना लागणारी वस्त्रे आदी गोष्टींची पूर्तता करता करता कुटूंबप्रमुखाची नाकी नऊ येते. आजचे शिक्षणही महाग झालेले आहे. ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांनीच शिकावे अशी व्यवस्थाच राज्य कारभार करणाऱ्यांनी केली.
खासगीकरणाच्या गोंड्स नावाखाली देश अप्रत्यक्षपणे विकला जात आहे. परदेशी कंपण्यांचे आर्थिक धोरणच बदलवून टाकले आहे. या आचरणामुळे सर्वसामान्य जनता हतबल झाली आहे. दवाखाना आहे तर डॉक्टर नाही, डॉक्टर आहे तर औषध नाही. औषध आहे तर किंमती परवडण्यासारख्या नाहीत. औषधांच्या किंमतीवर नियंत्रण नाही. भेसळयुक्त औषधी बाजारात खुलेआम विकली जात आहे.
दिवाळी हा दीप उत्सवाचा सण. मात्र घरात मातीच्या तेलाचा दिवा जळत राहील, अशी परिस्थिती नाही. महागाईने गोरगरिबांना आसवे दिलीत. आज ग्रामीण भागात रॉकेलचे परवानाधारक काळाबाजार करून चार पट नफा कमवितात. पण राशन कार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही. विजेचाही प्रश्न तोच, ग्रामीण भागात एकदा वीज गेली की, १५-१५ दिवस येत नाही. मात्र वीज बिल अव्वाच्या सव्वा काढून वसूल केले जात आहे.
सरकार स्थापन झाल्याझाल्याच पेट्रोल, डिझेल, साखर, तेल, डाळ, भाजीपाला आदी महत्त्वाच्या वस्तु महाग झाल्या. महागाईच्या भस्मासुरामुळे एक लिटर तेल व एक किलो डाळ घेणारा एका पावावर आला. मोलमजुरी करणारा माणूस काम मिळाले नाही तर उपाशी, त्याची बायको पोरंही उपाशीच! कामाला निघालेला माणूस घरी बायको पोरं उपाशी राहू नये म्हणून वाटेल ती कामे करतो. परंतु तुटपूंज्या पैशात घरसंसार कसा चालवावा, हा प्रश्न महागाईमुळे असतो. विविध सणाला घरी गोडधोड करावे आणि पोराबाळामध्ये आनंदाने रमावे असेही आता राहिलेले नाही. सणांची मजाच आता महागाईने हिरावून घेतली आहे. आता सणांची श्रृंखला चालू झाली असून येणारे प्रत्येक सण गृहिणीला व सामान्य जनतेला मात्र यंदा कडू वाटू लागली आहे.
या महागाईवर शासकीय यंत्रणेचे नियंत्रण राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी व शासन कुंभकर्णी झोपेत आहेत. प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे भाव पुन्हा वाढेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे सरकारकडून सतत वाढत असलेली महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे, असे असले तरी हा दावा फोल ठरत असून दिवसेंदिवस वस्तूंचे दर वाढतच आहे. या महागाईला सामोरे जाताना अनेक सर्वसामान्य कुटुंबात कलह निर्माण होत आहे. हा महागाईचा भस्मासूर पुन्हा सर्वसामान्य जनतेच्या मानगुटीवर बसून रक्त पिणार असेच दिसून येत आहे. या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
वरण जेवणातून बाद
४तुरीच्या डाळीचे भाव कधी नव्हे एवढे यंदा कडाडले आहे. तब्बल २०० रुपये किलोप्रमाणे ही डाळ विकली जात आहे. सर्वसामान्य व मोलमजुरी करणाऱ्यांना दररोजच्या जेवणात तूर डाळीचे वरण करणे अवाक्याबाहेर होत आहे. त्यामुळे अनेकांच्या जेवणातून वरण बाद झाल्याचे दिसून येत आहे. तूर डाळ जेवणातला महत्त्वपूर्ण आहार आहे. त्यामुळे मुलाबाळांच्या पोषण आहाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, तूर डाळीसोबतच मसूर, मूग, उडीद व चणा डाळीचे भावही गगनाला भिडले आहेत.
खरीप हंगामाचाही फटका
चंद्रपूर जिल्ह्यात जवळजवळ ६० टक्के जनता शेतीवर निर्भर आहे. शेतपीक चांगले झाले. शेती चांगली पिकली तर शेतकऱ्यांचे सर्व सण आनंदात जातात. यावेळी मात्र अत्यल्प पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. सिंचनाअभावी शेतपिकांवर परिणाम झाला. त्यामुळे उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी तर यावर्षी अंधकारमयच झालेली आहे.