महाकाली मंदिरावरील खासगी हक्क संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:27 PM2018-03-17T23:27:59+5:302018-03-17T23:27:59+5:30

चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिरावर आजवर असलेल्या श्री महाकाली देवस्थान चांदा ट्रस्टचा मालकी हक्क संपुष्टात आला आहे.

Due to private rights over the Mahakali temple | महाकाली मंदिरावरील खासगी हक्क संपुष्टात

महाकाली मंदिरावरील खासगी हक्क संपुष्टात

googlenewsNext
ठळक मुद्देसहायक धर्मदाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश : मंदिरावर आता निरीक्षकाचा वॉच, आजपासूनच कार्यवाही होणार

राजेश भोजेकर।
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत देवी महाकाली मंदिरावर आजवर असलेल्या श्री महाकाली देवस्थान चांदा ट्रस्टचा मालकी हक्क संपुष्टात आला आहे. १८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीत यात्रेदरम्यान मंदिराचा कारभार बघण्यासाठी निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर मंदिराला देणगी स्वरुपात मिळालेली रक्कम, दागिणे व वस्तुंचा चोख हिशेब ठेवला जाणार आहे. ही रक्कम मंदिराच्या उपयोगात आणली जाणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, यात्रेनंतर ट्रस्टीने आजवर केलेल्या कारभाराची सखोल चौकशी केली जाणार आहे. हा महत्त्वपूर्ण आदेशवजा निर्वाळा येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त रामचंद्र चव्हाण यांनी शनिवारी दिला. या आदेशाची रविवार १९ मार्चपासूनच निरीक्षकामार्फत कडक अंमलबजावणीचे आदेशही दिले आहेत.
देवी महाकालीचे दर्शन घेण्यासाठी यात्रा कालावधीत महाराष्ट्रातील विविध भागांसह अन्य राज्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र येथे आल्यानंतर कुठल्याच सुविधा मिळत नाही. भाविकांनी मंदिराला दिलेल्या देणग्यांचा हिशेब ठेवला जात नाही. या देणग्या मंदिरासाठी उपयोगात न आणता ट्रस्टी स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर करीत असल्याची गंभीर तक्रार मराठवड्यातील बाबुराव डोणगावकर या यात्रेकरूने केली. या आधारे आज झालेल्या सुनावणीदरम्यान सहायक धर्मदाय आयुक्तांनी हा महत्त्वपूर्ण आदेश दिला. सदर आदेशानुसार, १८ मार्च ते १४ एप्रिल २०१८ या कालावधीपर्यंत निरीक्षकाला संपूर्ण देखरेखीचे अधिकार दिले आहेत.
१८ मार्च रोजी निरीक्षक स्वत: मंदिरात जावून दानपेट्या सील केलेल्या आहे वा नाही याची चौकशी करतील. त्या पंचासमक्ष उघडून त्यातील रक्कम मोजून ती ट्रस्टीद्वारे मंदिराच्या बँक खात्यात जमा केली जाईल. दुसऱ्या दिवशी जमा केलेल्या रकमेची पावती ट्रस्टी निरीक्षकाला देतील.
त्या दानपेट्यांचे पुन्हा पंचनामे करून त्यावर निरीक्षकाची स्वाक्षरी व शिक्के मारून बंद केल्या जातील. यानंतर ४ ते १४ एप्रिल २०१८ च्या दरम्यान त्या दानपेट्यांचे पंचनामे करून उघडल्या जातील. त्यातील रक्कम ट्रस्टीमार्फत मंदिराच्या बँक खात्यात जमा करून पावती निरीक्षकाला द्यायची आहे. तसेच निरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय मंदिर समिती स्थापन करण्याचे आदेशही दिले आहेत. या समितीमध्ये ट्रस्टीही सदस्य राहतील. तसेच उर्वरित तीन सदस्य कोणीही बनू शकतो, यासाठी सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात भेटावे लागणार आहेत.
दागिने मंदिराच्या खजिन्यात
देवी महाकालीला येणाऱ्या वस्तू, देणग्या, अन्नधान्य, दागिने समितीने ताब्यात घेऊन त्याची नोंद रजिस्टरवर घ्यायची आहे. त्यावर सर्व सदस्यांच्या स्वाक्षरीनिशी त्या सर्व वस्तु ट्रस्टीकडे सोपवायच्या आहे. ४ एप्रिल ते १४ एप्रिल २०१८ दरम्यान देवी महकाली मंदिरात असलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू निरीक्षकाकडून ट्रस्टीमार्फत तपासून घेतल्या जाणार आहे. नंतर त्या वस्तू देवीच्या खजिन्यात जमा करावयाच्या आहेत, असेही धर्मदाय आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे.
दागिने बदल अर्ज सहायक धर्मदाय आयुक्तांकडे सादर करावा लागणार आहे. तसेच देवीला येणारी साडीचोळी व नारळ यांचा शेवटी लिलाव करून येणारी रक्कमही मंदिराच्या उपयोगात आणण्याचे आदेश देण्यात आले आहे. उल्लेखनीय, सदर आदेशात यात्रा कालावधीत संशय आल्यास संस्थेच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करण्याचे अधिकार निरीक्षकाला देण्यात आले आहेत.
संस्था खासगी मालकीची असल्याचा गैरसमज दूर
ही संस्था आमच्या मालकीची आहे, हा ट्रस्टीचा गैरसमज सहायक धर्मदाय आयुक्तांनी दूर केला आहे. नोंदणी अर्ज क्रमांक ५२१/१९६१ नुसार दि. २६/८/१९६१ रोजी बाम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट १९५० चे कलम १९ प्रमाणे सार्वजनिक विश्वस्त संस्थांमधून सदर मंदिराची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ही संस्था विश्वस्त संस्था आहे. खासगी मालकीची नाही, ही बाबही आदेश देताना सहायक धर्मदाय आयुक्त यांनी श्री महाकाली देवस्थानचे सुनील महाकाले यांच्या निदर्शनास आणून दिली.
ट्रस्टीच्या कारभाराची चौकशी होणार
संस्थेकडे असलेल्या मालमत्तेचा तपशील आतापर्यंत केलेल्या खर्चाचा तपशीलवार हिशेब, प्राप्त देणग्यांचा तपशील,मंदिराला मिंळालेल्या वस्तु, अन्न धान्य, भाविकांना मिळणाऱ्या सुविधा, शुल्क आकार व त्या रकमेचा विनियोग यासर्व बाबींचा चौकशी अहवाल यात्रेनंतर तीन महिन्यात सादर करण्याचे आदेशही बजावले आहेत.

Web Title: Due to private rights over the Mahakali temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.