भांडणामुळे बसवाहक पडल्या बेशुद्ध !
By admin | Published: January 22, 2017 12:44 AM2017-01-22T00:44:50+5:302017-01-22T00:44:50+5:30
एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे.
चंद्रपुरातील घटना : शहर बससेवा बंद केल्याने हाणामारीची पाळी
चंद्रपूर : एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करीत त्याचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केले आहे. यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. यासोबतच शहरात बस थांबत नसल्याने बसवाहक आणि प्रवाशांमधील भांडणाचे प्रमाणही वाढले आहे. अशाच एका भांडणातून महिला वाहकाला दवाखान्यात भरती करावे लागले. हा प्रकार आज शनिवारी येथील बागला चौकात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडला. पुष्पा भानारकर असे सदर महिला वाहकाचे नाव आहे.
यापूर्वी चंद्रपुरात शहर बससेवा सुरू होती. त्यामुळे अनेक नागरिक या बससेवेचा लाभ घेत शहरातील विविध ठिकाणी बसने ये-जा करीत होते. मात्र मागील महिन्यापासून एसटी महामंडळाने शहर बससेवा बंद करून त्याचेच रुपांतर ग्रामीण बससेवेत केले. मात्र ही बस शहरात ठराविक एक-दोन ठिकाणी थांबते. इतर ठिकाणी ही बस थांबत नसल्याने प्रवाशी व बसवाहकांमध्ये अनेकदा कडाक्याचे भांडण होत आहे.
पुष्पा भानारकर या बसवाहक आज सकाळ पाळीत दुर्गापूर ते राजुरा बसफेरीसाठी (बस क्रमांक एमएच ३४ एन ९४२७) निघाल्या. ही बस सकाळी ११ वाजताच्या सुमारास लालपेठ पोलीस चौकीजवळ येताच बसमधील दोन महिला प्रवाशांसोबत बस थांबविण्यावरून वाहक भानारकर यांच्यासोबत वाद झाला. तिथून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत त्यांचा वाद सुरूच होता. त्यानंतर हा वाद विकोपाला जाऊन एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण आले. त्यानंतर अचानक वाहक भानारकर यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. त्यामुळे सदर प्रवाशांना उतरवून बस बागला चौकात थांबविण्यात आली. भानारकर या बागला चौकीत गेल्या आणि तिथेच बेशुद्ध होऊन खाली पडल्या. विशेष म्हणजे, हा प्रकार सुरू असताना बसचालक वेगळ्याच चिंतेत होते. त्यांची बस एकदा बंद झाली की ती पुन्हा सुरू होत नाही, एवढी भंगार होती. त्यामुळे ते बसला बंद करू शकत नव्हते. नागरिकांनीच त्या मार्गावरून जाणाऱ्या एक रुग्णवाहिकेला थांबवून वाहक पुष्पा भानारकर यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. (शहर प्रतिनिधी)
दीड तासानंतर पोहोचले महामंडळाचे अधिकारी
हा प्रकार घडला तेव्हा बसचालक घटनास्थळावर होते. बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. वाहक बेशुद्ध झाल्यानंतर बसचालक तिकीट मशीन सांभाळू लागले. बसही बंद करू शकत नव्हते. अखेर नागरिकांनीच वाहक पुष्पा भानारकर यांना उचलून रुग्णवाहिकेत ठेवले. तिथून एसटी महामंडळाच्या कार्यालयात फोन करून ही माहिती देण्यात आली. रुग्णालयापासून एक किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर हे कार्यालय आहे. मात्र एसटी महामंडळ कार्यालयातून केवळ एकच कर्मचारी तेदेखील तब्बल दीड तासानंतर रुग्णालयात पोहचला. यावरून महामंडळ आपल्या कर्मचाऱ्यांप्रति किती संवेदनशील आहे, हे दिसून येते.
त्रास वाढला
शहर बससेवेचे ग्रामीण बससेवेत रुपांतर केल्यामुळे वाहकांचा त्रास वाढला आहे. प्रवाशांसोबत दररोज भांडणे होत आहे. वाहक पुष्पा भानारकर यादेखील यामुळे त्रस्त होत्या, असे त्यांनीच सांगितले. त्यामुळे त्यांनी ही ड्युटी बदलवून देखील मागितली होती. मात्र अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही.