पावसाची हुलकावणी अन् शेतकऱ्यांची कासाविसता
By admin | Published: July 14, 2014 01:46 AM2014-07-14T01:46:23+5:302014-07-14T01:46:23+5:30
रोजचे ढगाळ वातावरण, सायंकाळ पाऊस येण्याची
ढगाळ वातावरण : मात्र पावसाचे बरसणे नाही !
चंद्रपूर : रोजचे ढगाळ वातावरण, सायंकाळ पाऊस येण्याची आशा आणि पावसाची हुलकावणी यामुळे शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. गेल्या एक महिन्यांपासून शेत आणि आभाळाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा आजही आभाळाकडेच आशाळभूत नजरेने बघत आहे. आज रविवारी पुन्हा पावसाने चंद्रपूरसह एक दोन तालुक्यात रिमझिम हजेरी लावली. इतर तालुके कोरडेच राहिले. जुलै महिन्यात पाऊस अशीच हुलकावणी देत राहिला तर शेतकऱ्यांचा खरीप हंगाम यावर्षीदेखील हातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने जूनच्या प्रारंभीच खरीपासाठी तयार झाला होता. मशागतीची कामे आटोपली. सावकार, बँक नातलगांचे उंबरठे झिजवून पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. मृग लोटून पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे आगमन झाले नाही. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. जून महिन्याचा पंधरवाडा उलटल्यानंतर अलनिनोचे संकट मान्सूनवर ओढवले. याचा फटका अवघ्या महाराष्ट्रालाच बसला. जून महिना लोटला तरी पाऊस पडला नाही. त्यामुळे सर्व तयारी करून बसलेला शेतकरी मोठ्या विवंचनेत सापडला होता.यंदा जिल्ह्यातील चार लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. यातील निम्म्या ठिकाणच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर ज्यांनी पेरण्या केल्या त्यांचे बियाणे संकटात सापडले आहे. त्यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करीत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस तर दूरच उलट उन्हाची काहिली जाणवत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना २०१२ चा दुष्काळ आठवू लागला होता.
याला अपवाद म्हणून काही तालुक्यात दोन-तीनदा पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जमिनीत पाणी साचले नसले तरी जमीन बऱ्यापैकी ओली झाली होती. त्यामुळे पहिल्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी जमीन ओली होताच पेरणीची कामे सुरू केली आहे. अनेकांच्या पेरण्या झाल्या. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने दडी मारली. यामुळे शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली. बियाणे मातीतच सडून गेले. अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. दरम्यान ८ जुलैला जिल्ह्यात पावसाने बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे चेहरे खुलले. आतातरी चांगल्या दिवसांची सुरूवात होईल, अशी त्यांना आशा होती. मात्र पावसाने पुन्हा दडी मारली. या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. (शहर प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा खर्च वाढला
कापूस, धान व सोयाबीनसाठी सरासरी शेतकऱ्याला प्रति एकर २० ते २५ हजार रुपयांचा खर्च येतो. यावेळी खरीपाची पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली. दोनदा अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले बियाणे मातीमोल झाले. अनेक शेतकऱ्यांना दुबारपेरणीसाठी पुन्हा बियाण्यांची खरेदी करावी लागली. यात त्यांचे हजारोंचे नुकसान झाले.त्यामुळे त्यांचा आपुसकच खरिपाचा खर्चही वाढला आहे.
भाजीपाल्यांवरही परिणाम
पावसाच्या हुलकावणीचा परिणाम भाजीपाल्यांच्या वाड्यांवरही दिसून येत आहेत. भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होत आहे.