पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आबाळ
By Admin | Published: July 10, 2015 01:29 AM2015-07-10T01:29:23+5:302015-07-10T01:29:23+5:30
निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली.
दुष्काळाचे सावट : उष्णतेमुळे पीक करपले
घोसरी: निसर्गाच्या दृष्टचक्रात सतत पिचणारा बळीराजा यंदाही हवालदिल झाला आहे. पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे उष्णतेत वाढ झाली. यामुळे अंकूरलेले बियाणे जमिनीतच करपत आहेत. दुबार पेरणीच्या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना पावसाची सुतराम शक्यता दिसत नसून कोरड्या दुष्काळाची गडद छाया आवासून उभी आहे.
निसर्गाचे दृष्टचक शेतकऱ्यांच्या पाचविला पूजलेले आहे. दरवर्षी या ना त्या कारणाने नापिकीचा सामना करावा लागेत आहे. मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने घोसरी- नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली. परंतु नंतर पावसाने दडी मारल्याने बियाणे व धान पऱ्हे करपून उद्ध्वस्त होत आहेत.
सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला बळीराजा सावरण्यात केविलवाणी धडपड करीत दुबार पेरणीकरिता बियाणीची जुळवा-जुळव करुन कर्ज शिरावर घेतलेले आहे. परंतु पावसाने दीर्घ विश्रांती घेतलेली आहे.
नित्यनेमाने मेघ दाटून येत असल्याने शेतकरी, चातकासारखी नभाकडे बघत आहे. परंतु निसर्ग कोपलेला आहे. परिसरात मुख्यत्वे धान पिकासह सोयाबिन, कापूस यांची पेरणी केलेली आहे. परंतु पावसाने दगा दिला असल्याने धान पिके धोक्यात आली आहे. दुबार पेरणीची सोय नसल्याने कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली असल्याने शेतकरी हतबल दिसत आहे. (वार्ताहर)