बाबासाहेब रमार्इंच्या त्यागामुळे घडले
By admin | Published: May 29, 2016 01:07 AM2016-05-29T01:07:24+5:302016-05-29T01:08:15+5:30
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी होता. त्यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी संविधान दिले.
भय्या खैरकर : विसापुरात पार पडला रमाई स्मृतिदिन
बल्लारपूर : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष वंचित समाज घटकांना न्याय देण्यासाठी होता. त्यांनी अखंड भारताच्या निर्मितीसाठी संविधान दिले. त्यांच्या सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचे मोठे योगदान मिळाले. त्यांच्यातील आदर्श आजही समाजाला प्रेरणा देणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असताना मातोश्री रमाबार्इंनी ती जबाबदारी प्रामाणिकपणाने सांभाळली. परिणामी डॉ.आंबेडकरांना समाजाच्या उत्थानासाठी कार्य करता आले. आंबेडकर खऱ्या अर्थाने रमाईच्या त्यागामुळे घडले, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत भय्यासाहेब खैरकर यांनी विसापूर येथे केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील मानव मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ग्रामपंचायत प्रांगणात प्रबोधन कार्यक्रम पार पडला. यावेळी मातोश्री रमाई यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील योगदान या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विसापूर येथील सरपंच रिता जिलटे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून भैयासाहेब खैरकर, चंद्रशेखर गेडाम, चंद्रकांत पावडे, सामाजिक कार्यकर्ता किरणकुमार पुणेकर, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज गोहणे, गायक कलावंत कुणाल वराळे, अफसाना शेख, मुन्ना खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य विजय वैद्य, भीमराव पाझारे, स्वाती चिकाटे, तुळशीराम गोरे, बुद्धिवान कांबळे यांची उपस्थिती होती.
दरम्यान, औरंगाबाद येथील गायक कलावंत कुणाल वराळे, विकास पेरगुलवार, सतीश शेंडे यांच्या संचाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर, मातोश्री रमाई, तथागत बुद्ध यांच्या जीवनावर आधारित समधूर गीतांचा कार्यक्रम सादर केला. ‘मेरा भीम जबरदस्त है’, या गाण्याने प्रेक्षकांना थिरकायला लावले. प्रास्ताविक आयोजक भाऊराव तुभडे, संचालन अफसाना शेख यांनी तर आभार स्वाती चिकाटे यांनी मानले. यावेळी आकाश पाझारे, रमेश लिंगमपल्लीवार, गौतम वनकर, प्रशांत चिकाटे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)