पोंभूर्णा तालुक्यातील वाढत्या बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येत
By admin | Published: January 11, 2015 10:50 PM2015-01-11T22:50:12+5:302015-01-11T22:50:12+5:30
पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे
पोंभूर्णा : पदवी, पदविका व महाविद्यालय शिक्षण पूर्ण करून हजारो तरुण-तरुणी बाहेर पडतात. नंतर नोकरी शोधण्यात आलेले अपयश व बेरोजगारीमुळे युवापिढी नैराश्येच्या खाईत लोटला जात असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे.
सर्व युवक-युवती आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगारासाठी मनात सुप्त इच्छा बाळगून असतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हवी तशी नोकरी मिळेल, अशी सर्वांनाच आशा असते. परंतु तसे घडत नाही.
कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खासगी ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यानंतर मुलाखत दिली तर तुम्हाळा कळवू, असे संबंधित उमेदवाराला सांगण्यात येते. पुढे त्याला काहीच कळविले जात नाही. नोकरीच्या शोधात अशी कितीतरी वर्षे निघून जातात. पण नोकरी मात्र मिळत नाही. तसेच पाहिजे तसा व्यवसायही करता येत नाही. त्यामुळे तरुणांच्या नशिबी नैराश्य आले आहे. आजुबाजूला नजर टाकली तर ज्यांचेजवळ पैसा आहे किंवा ज्यांची ओळख वरपर्यंत आहे, अशानाच सध्या नोकरीची संधी मिळत आहे.
सरकारी कार्यालय, शिक्षण संस्था पैशावरच चालतात. जे युवक परिश्रम घेऊन शिक्षण घेतात. ते पैशाअभावी नोकरीपासून दूर आहेत. यातून तरुण पिढीचे मन नैराश्याने ग्रासले आहे. शेवटी परिस्थितीच त्यांची तशी बनली आहे.
या युवा पिढीवर पुढे देशाचे भवितव्य अवलंबून आहे, पण ही युवापिढी नैराश्येच्या खोल गर्तेत ढकलल्या गेली तर देशाचे काय होईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शिक्षणासाठी वारेमाप खर्च करावा लागतो तर दुसरीकडे मात्र शिक्षण झाल्यावरही चप्पल झिजवावे लागते. परिश्रम करूनही आपल्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल शिक्षण घेऊन काय उपयोग, असा प्रश्नही बेरोजगारांना सतावत आहे. (वार्ताहर)