आवाळपूर-सांगोडा रस्त्याची दुरवस्था
By admin | Published: May 29, 2016 01:04 AM2016-05-29T01:04:31+5:302016-05-29T01:04:31+5:30
आवाळपूर-सांगोडा हा पाच किमी अंतराचा रस्ता. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची पूर्णत दुरावस्था झाली आहे.
वाहनधारक त्रस्त : जडवाहतुकीमुळे रस्त्याची झाली दैना
आवाळपूर : आवाळपूर-सांगोडा हा पाच किमी अंतराचा रस्ता. परंतु सद्यस्थितीत या रस्त्याची पूर्णत दुरावस्था झाली आहे.
आवाळपूर-सांगोडा हा रस्ता यवतमाळ जिल्ह्यातील वणी बाजारपेठ तसेच घुग्घुस, चंद्रपूर शहर गाठण्यासाठी सुकर मार्ग मानला जातो. रोज या रस्त्यावरती शेकडो गाड्या ये- जा करतात. मात्र रस्त्याची स्थिती बिकट असल्याने मार्ग काढताना अडचण निर्माण होत आहे. याच रस्त्याने मुली सिमेंट उद्योग, अल्ट्राटेक सिमेंट उद्योग आणि नव्यानेच सुरू झालेल्या वैनगंगा वेकोलि क्षेत्रातील कामगार तसेच शेतीला पूरक व्यवसाय करणारे शेतकरी बांधव या रस्त्याचा उपयोग करतात. मात्र रस्त्यावरुन जाताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
तसेच या रस्त्याने सिमेंट उद्योगातील ओव्हरलोड जड मालवाहू ट्रक चालत असल्याने रस्त्याची अधिकची दुरवस्था झाल्याचे दिसत आहे. ट्रक मागून येणाऱ्या दुचाकीधारकांना डोळ्यात धूर जात असल्याने समोरचे दिसेनासे होत आहे. एवढेच नाही तर डोळ्याला गंभीर जखमा झाल्याच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. या समस्येची दखल घेऊन लोकप्रतिनिधीने लवकरात लवकर रस्ता नूतनीकरण करावे, अशी आवाळपूर, हिरापूर ग्रामस्थांनी मागणी केली आहे. (वार्ताहर)