जिल्ह्यावर भीषण दुष्काळाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:07 AM2017-08-06T00:07:40+5:302017-08-06T00:08:58+5:30
यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यंदा जोरदार पर्जन्यमानाचा वेधशाळेचा अंदाज फोल ठरला. पावसाळ्याचे जून व जुलै हे दोन महिने लोटूनही जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३५.४०६ मिमी असताना आतापर्यंत केवळ सरासरी ४०२.४८९ मिमी पाऊसच पडला. परिणामी जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांसह ग्रामीण जलस्रोतांची स्थितीही बिकट आहे. एकूणच जिल्ह्यात यंदा भीषण कोरड्या दुष्काळाचे संकट घोंगाऊ लागले आहे.
वेळशाळेच्या अंदाजाला यंदा पावसाने चांगलीच चपराक दिली. जुलै हा पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाचा महिना मानला जातो. चार दिवसांचा अपवाद वगळला तर हा संपूर्ण महिना कोरडा गेला. जिल्ह्याची पावसाची सरासरी ११३६.४०६ मिमी आहे. मागील वर्षी सरासरी ओलांडून म्हणजेच १३९५.७१३ मिमी पाऊस बरसला.
मात्र यावर्षी वरूणराजाने जिल्ह्याला वाकुल्या दाखविल्या. जून आणि जुलै या दोन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ३९६.५६ मिमी पाऊस पडला. आज ३ आॅगस्ट रोजी सरासरी ४०२.४८९ मिमी पावसाची नोंद झाली. म्हणजेच केवळ ३० ते ३५ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी असतो. या दोन महिन्यात पावसाची ७० टक्के उणीव कशी भरून निघेल, हा प्रश्नच आहे.
कमी पावसामुळे जिल्ह्यात नदी, नाले, बोड्या, तलाव यातील जलसाठाही चिंताजनक आहे. १० ते २० टक्के धान उत्पादक शेतकºयांचे अद्याप रोवणे शिल्लक आहे. उर्वरित शेतकºयांचे रोवणे झाले. मात्र आता पिकांना पाणी हवे आहे. पाऊस पडला नाही, तर शेतकºयांचे यंदा अतोनात नुकसान होणार आहे.
चंद्रपूरकरांवरही पाण्याचे संकट
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र सद्य:स्थितीत इरई धरणात केवळ ३६.६३ टक्केच पाणी आहे. या धरणातून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालाही पाणी दिले जाते. त्यामुळे या धरणातून झपाट्याने पाण्याची पातळी कमी होते. येत्या काही दिवसात या धरणात पाणी जमा झाले नाही, तर पुढे चंद्रपूरकरांवर पाण्याचे भीषण संकट ओढवू शकते.
सिंचन प्रकल्पांची स्थिती चिंताजनक
जिल्ह्यातील आसोलामेंढा प्रकल्पात ६३.११ टक्के जलसाठा आहे. हा अपवाद सोडला तर उर्वरित दहाही सिंचन प्रकल्पांची स्थिती जुलै महिन्यातच चिंताजनक आहे. घोडाझरी प्रकल्प ३१.७५ टक्के, नलेश्वर-३४.८३, चंदई-३८.९७, चारगाव-३५.२३, अमलनाला-१७.५८, लभानसराड-०.०३, पकडीगुड्डम-१०.९३, डोंगरगाव-४२.४७, इरई-३६.६३ आणि लालनाला प्रकल्पात १९.७८ टक्के जलसाठा आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या प्रकल्पात ७० ते ७२ टक्के जलसाठा होता.