महावितरणच्या अजब कारभारामुळे माजरीकरांच्या नशिबी अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:24 AM2021-02-15T04:24:56+5:302021-02-15T04:24:56+5:30
माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, ...
माजरी : येथील स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कंपनीकडे वीज जोडणीकरिता अर्ज सादर करून वीज जोडणीची मागणी केली होती. मात्र, एक वर्ष लोटूनही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, येथील नागरिकांनी वीज जोडणीसाठी विनंत्या, अर्ज, निवेदनाद्वारे संघर्ष सुरू केला. अजूनही वीज जोडणी न मिळाल्याने पदरी निराशाच आहे.
भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठे गाव माजरी येथील बहुतांश ग्रामस्थांचे वीज जोडणीकरिता प्रस्ताव मंजूर आहेत. महावितरण कंपनीच्या अजब कारभारामुळे माजरीकर अंधारात आहेत. महावितरण कंपनीने डीपीडीसीतील मंजूर झालेली निधी दुसरीकडे वापरला का, असा सवालही उपस्थित होत आहे. अद्याप यावर कुठलीच कारवाई झाली नसल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. यासंदर्भात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी येथील ग्रामस्थांनी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. माजरीकरांची गंभीर समस्या लक्षात घेता जनप्रतिनिधींनी उद्भवलेली गंभीर समस्या लवकर मार्गी लावाव्यात, अशी मागणी पीडित ग्रामस्थांनी केली आहे.
बॉक्स
वेकोलिचा नकार
मागील अनेक वर्षांपासून वेकोलिद्वारे वीज पुरवठा करण्यात आला होता. सध्या वेकोलिने वीज पुरवठा बंद केल्याने गंभीर समस्या उद्भवली आहे. येथील ग्रामस्थांना विजेअभावी त्रास सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थीसुद्धा ऑनलाईन क्लासेसपासून वंचित राहात आहेत. वेकोलिच्या खाणीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सेवा बजावण्यात आयुष्यातील ३५-४० वर्षे झिजविली. दरम्यान, वेकोलिच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी महावितरण कंपनीचे विद्युत मीटर येईपर्यंत तीन महिने वीजपुरवठा करण्याची विनंती वेकोलि प्रशासनाकडे केली होती. मात्र, वेकोलि प्रशासनाने त्यांच्याच सेवकांना वीज पुरवठा करण्यास नकार दिला.