अवकाळी पावसामुळे दाणादाण
By admin | Published: January 3, 2015 10:58 PM2015-01-03T22:58:14+5:302015-01-03T22:58:14+5:30
जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले
चंद्रपूर : जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, धान, तुरीचे काही प्रमाणात नुकसान झाले असून रबी पिकांना थोडाफार दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांची चांगलीच फजीती होत आहे.
हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकरी जोमाने कामाला लागले. मात्र सुरुवातीला पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर दुबार पेरणी केली. मात्र पिकांची अपेक्षीत वाढ झाली नाही. पावसाळ्यामध्ये अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांना पाहिजे तसे उत्पन्न घेता आले नाही. तर सिंचनक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांनाही जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेल्याने सिंचन करताना अनेक अडचणी येत आहे. खरीप हातातून गेल्यानंतर रब्बीकडे शेतकऱ्यांची आशा होती. मात्र पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने रब्बी पिकांचेही नियोजन कोलमडले. कृषी विभागाने रब्बीसाठी २ हजार ११० हेक्टर क्षेत्र निर्धारित केले असताना केवळ ६९२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्षात पेरणी करण्यात आली. मात्र तीही जेमतेमच आहे. त्यातच आता अकाली पावसाने शेतकऱ्याना चांगलेच झोडपून काढले आहे.
सध्या शेतामध्ये कापूस, धान, तूर, मिरची, हरभरा, उळीद, मुंग, भाजीपाला आहे. यामध्ये कापूस आणि कापणी केलेल्या धानाचे मोठ्या प्र्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी तूरीलाही फटका बसला आहे. मिरची तोड व्हायची असल्याने या पिकाला फटका बसला नसला तरी उत्पादनात घट येणार आहे.
काही कोरडवाहू मातीच्या जमिनीमध्ये कापूस निघत आहे. मात्र अवकाळी आलेल्या पावसामुळे कापसाची प्रत घसरली आहे. कापसाला काळे डाग पडले आहे. तर काही ठिकाणी झाडावरून कापूस लोंबकळत असल्याने तो वेचणार तरी कसा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यातच भाव नसल्याने घडाईपेक्षा मळाई जास्त अशी अवस्था कापूस उत्पादकांची झाली आहे.
विशेष म्हणजे, सिंचन असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस आहे. या कापसाचे पूर्णत: नुकसान झाले. तर दुसरीकडे मातीची जमिन आणि सध्या बोंड असलेल्या झाडांना पाणी मिळाल्यामुळे कापसाच्या वजनात वाढ होईल, असेही बोलल्या जात आहे.
मूल, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आदी तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले आहे. सध्या काही शेतकऱ्यांचे धान निघाले आहे. तर काहींनी शेतामध्ये धान कापून ढिग लावून ठेवले आहे. या ढिगाला पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. अनेकांच्या शेतातील धान ओले झाले आहे.
अत्यल्प पावसामुळे कोरडवाहू रब्बी पिकांच्या पेरणीत यावर्षी झपाट्याने घट झाली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनीच गहू, हरभऱ्याचे पेरणी केली. त्यामुळे पावसाचा या पिकांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. (नगर प्रतिनिधी)