बस बंद झाल्याने विद्यार्थ्यांवर शिक्षण सोडण्याची पाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2024 02:26 PM2024-08-27T14:26:44+5:302024-08-27T14:29:11+5:30
आगार प्रमुखांना साकडे : बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही/नवरगाव : नवरगाव विद्यार्थ्यांना सकाळी घ्यायला बस येते. मात्र सायंकाळी सोडायला बस येत नसल्याने १३ किमी घनदाट जंगलातून जायचे कसे, असा गंभीर प्रश्न विद्यार्थी व कारवावासीयांसमोर निर्माण झाला आहे.
सिंदेवाही तालुक्याच्या अगदी शेवटच्या टोकावर ताडोबाच्या कोअर झोन अभयारण्यात कारवा गाव असून गावामध्ये जिल्हा परिषदेची चवथी पर्यंत शाळा आहे. त्या समोरील शिक्षण घेण्यासाठी १३ किमी संपूर्ण घनदाट जंगलातून शिवणी, तर उच्च शिक्षणासाठी ३० किमी. सिंदेवाही वा इतर ठिकाणी जावे लागते. विद्यार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन मागणी केल्याने बस सुरू झाली. त्यानुसार मानव विकास कार्यक्रमांतर्गत सिंदेवाही शिवणी कारवा ही बस सकाळी ९ वाजता गावात येते. त्यामुळे गावातील विद्यार्थी शिवणी येथे शिक्षण घेण्यासाठी जातात. मात्र सायंकाळी ५ वाजता येणारी बस बंद केली असल्याने शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना गावाला परत जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने १३ किलोमीटर हे अंतर पायी चालत जावे लागते. रस्ता पूर्णतः जंगलाने व्यापलेला असून ताडोबा अभयारण्य असल्याने वन्यप्राण्यांची प्रचंड दहशत सुरू आहे. त्यामुळे कधीही प्राण्यांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शाळेत जाणेच बंद केले. तर काही विद्यार्थ्यांना शिवणी येथील नातेवाईकांकडे आधार घेण्याची वेळ आली.
सकाळी बस धावते, मग रात्री का नाही?
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून सकाळी ९ वाजता कारवा गावात बस जाऊ शकते, तर सायंकाळी ५ वाजता बस का जात नाही, असा गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. यासंबंधी गावकऱ्यांनी जिल्हा आगार प्रमुख कार्यालय चंद्रपूर आणि विधानसभा विरोधी पक्षनेते तथा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे सदर बस पूर्ववत विद्यार्थ्यांच्या सुटीच्या वेळी सायंकाळी ५ वाजता नियमित सुरू करावी, अशी मागणी कारवावासीयांनी केली आहे.