वेकोलीच्या खाणीत डंपर इमारतीवर धडकला; चार कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:27 AM2021-04-17T04:27:46+5:302021-04-17T04:27:46+5:30
गोवरी : वेकोली-बल्लारपूर क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील गोवरी १ खाणीत डंपर इमारतीवर धडकल्याने झालेल्या अपघातात खाण व्यवस्थापकासह ४ कर्मचारी ...
गोवरी : वेकोली-बल्लारपूर क्षेत्रातील राजुरा तालुक्यातील गोवरी १ खाणीत डंपर इमारतीवर धडकल्याने झालेल्या अपघातात खाण व्यवस्थापकासह ४ कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वेकोलीच्या धोपटाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातात माइनिंग सरदार जयप्रकाश महतो, प्रबंधक कौशलेंद्र प्रसाद, सहायक खान प्रबंधक मनीष साखरे व लिपिक प्रभाकर चन्ने हे जखमी झाले आहेत.
गोवरी १ खाणीत आरसी इमारतीच्या शेजारीच डंपरचे पार्किंग केल्या जाते. तिथे उभ्या असलेल्या एका नादुरुस्त डंपरला मेंटेनन्स विभागातील एक कर्मचारी दुरुस्तीसाठी नेण्याच्या प्रयत्नात असताना त्याचे नियंत्रण सुटल्याने डंपरने तिथेच असलेल्या लोखंडी खांबाला जबर धडक दिली. यानंतर डंपर आरसी इमारतीवर धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की, धडकेत आरसी इमारतीची भिंत तोडून डंपर आत शिरला. अचानक झालेल्या या अपघातात आरसी इमारतीच्या आत कामावर असलेले वेकोलीचे ४ कर्मचारी गंभीर जखमी झाले.