वन विभागाच्या कॅॅमेऱ्यांना बिबट्याची हुलकावणी
By admin | Published: November 22, 2014 12:24 AM2014-11-22T00:24:34+5:302014-11-22T00:24:34+5:30
येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही.
चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या आणि बफर झोनमध्ये येत असलेल्या वायगावमध्ये बिबट्याची दहशत काही केल्या कमी झाली नाही. बिबट्यावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाने ठिकठिकणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याची नजर चुकवून बिबट्या गावात प्रवेश करीत आहे. मागील दोन दिवसांमध्ये बिबट्याने कुत्रे आणि कोंबड्यावर ताव मारला आहे. एवढेच नाही तर, गुरांच्या गोठ्यात बिबट घुसला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे गोठ्यातून त्याला हुसकावण्यात यश आले आहे. दोन दिवसापूर्वी एका वासराचा बळी घेतल्यानंतर गावात दहशत आहे. वनविभागाने उपाययोजना सुरु केल्या आहे. मात्र त्या तुटपुंज्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
आदिवासीबहुल गाव म्हणून ओळख असलेल्या वायगावमध्ये बहुतांश नागरिकांकडे शेती आहे. शेती व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना शेतात जाणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकांकडे मोठ्या संख्येने जनावरे तसेच कोंबड्या, कुत्रे आहे. मागील काही दिवसांपासून गाव परिसरात बिबट्याने अक्षरश: धुमाकूळ सुरु केला आहे.
बिबट्याच्या दहशतीनंतर वनविभागाने काही ठिकाणी कॅमेरे लावले आहे. मात्र या कॅमेऱ्याचा कुठेच फायदा होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावात वनविभागाने गस्त सुरु केली. मात्र १० वाजेपर्यंत वनकर्मचारी येथे राहत नसल्याचे समजते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नजरेत बिबट्या येत नाही. गावात काही ठिकाणी सौर दिवे लावण्यात आले आहे. मात्र ते झाडांच्या खाली लावण्यात आले आहे. त्यामुळे सूर्यप्रकाश पडत नसल्याने त्याचाही काही उपयोग होताना दिसत नाही. केवळ एक ते दोन तास प्रकाश पडल्यानंतर ते दिवेही बंद पडत आहे.
विशेष म्हणजे, गावात शौचालयाची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे किमान वनविभागाने ग्रामस्थांना शौचालयाचे बांधकाम करून दिल्यास नागरिकांना दिलासा मिळू शकते.
वायगाव येथील माजी सरपंच विलास तोडासे म्हणाले, गाव परिसरात जंगल आहे. त्यामुळे नेहमी वन्यप्राण्यांचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागतो. त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजना केल्यास काही प्रमाणात हा त्रास सुटू शकतो. वनविभागाने गावात सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच बिबट्याला पकडण्यासाठी पिंरजे लावावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या शेती हंगाम असतानाही वाघाच्या दहशतीमुळे अनेकांनी शेतात जाणे बंद केले आहे. दिवसेंदिवस बिबट्याचे हल्ले वाढत आहे. आता तर, बिबट्याने गावात प्रवेश करणे सुरु केला आहे. मात्र वनविभागाने पाहिजे तशा उपाययोजना अद्यापही केल्या नसल्याने ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
सौरदिवे कुचकामी
गावातील काही रस्त्यांवर सौरदिवे लावण्यात आले आहे. मात्र सदर दिवे कुचकामी ठरत आहे. काही दिवे अगदी झाडाच्या खाली लावण्यात आल्याने त्यावर सूर्यप्रकाश पडत नाही परिणामी ते बंदच असते. तर काही दिवे रात्री १० ते ११ वाजेपर्यंत चालल्यानंतर तेही बंद पडते. त्यामुळे जेव्हा प्रकाशाची गरज असते तेव्हाच सौरदिवे बंद असल्याचे चित्र सध्या गावात आहे. त्यामुळे वन्यप्राणी गावात येत असले तरी नागरिकांना तसेच वनकर्मचाऱ्यांनाही दिसत नाही. (नगर प्रतिनिधी)