साधनाताईंच्या स्मृतीदिनानिमित्त वृक्षदींडी
By admin | Published: July 10, 2014 11:32 PM2014-07-10T23:32:05+5:302014-07-10T23:32:05+5:30
साधनाताई आमटे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आनंदवनात वृक्षदिंंडीचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवशी आनंदवनात १०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला.
वरोरा : साधनाताई आमटे यांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त गुरूवारी आनंदवनात वृक्षदिंंडीचे आयोजन करण्यात आले. आजच्या दिवशी आनंदवनात १०० वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला. वृक्षदिंडीत आबालवृद्ध सहभागी झाले होते. आजच्या वृक्षदिंडीने १९७६ मध्ये काढण्यात आलेल्या पहिल्या वृक्षदींडीचा आठवणी ताज्या झाल्या होत्या.
आनंदवनातील गोकूळ सभागृहाजवळ आज आनंदवनातील नागरिक, आनंद निकेतन महाविद्यालय, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, आनंदवन कृषी तंत्रनिकेतन, आनंदवन मूक बधीर, अंध, अपंग विद्यालयातील विद्यार्थी आनंदवनातील सर्वच विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते. भजन मंडळीही वृक्षदिंडीत सहभागी झाली होती. वृक्षदिंडी आनंदवनातील तलावानजीकच्या मार्गाने अभारण्य व श्रद्धावनजवळ पोहचली. डॉ. भारती आमटे व स्वरानंदवन आर्केस्ट्राच्या कलाकारांनी ‘श्रृखंला पायी असू दे..., माणुस माझे नाव, पाहूना गोजीरवाना’ आदी एका पेक्षा एक सरस गिते सादर केली. कर्मयोगी बाबा आमटे यांचे शताब्दी वर्ष असल्याने १०० वृक्ष लावण्याचा संकल्प जाहिर करण्यात आला. वृक्षदिंडीची सुरूवात १९७६ ला बाबा आमटे यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण परिसरात वृक्षदिंडी हा शब्दप्रयोग सुरू झाला. प्रत्येकाने वृक्ष लावण्याचा संकल्प करा, प्रेत जाळल्याने प्रदूषणाचा धोका होतो.
त्यामुळे प्रेत खड्डयात पुरुन त्यावर रोपटे लावावे, असे आवाहन सचिव डॉ. विकास आमटे यांनी या प्रसंगी केले. आजची वृक्ष दिंडीची संंकल्पना आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांच्या संकल्पनेतून साकारली याचा उल्लेखही याप्रसंंगी डॉ. आमटे यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)