पुस्तकांवर धूळ अन् वाळवी
By admin | Published: January 24, 2015 12:42 AM2015-01-24T00:42:22+5:302015-01-24T00:42:22+5:30
ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात वाचन संस्कृती जिवंत राहावी, शैक्षणिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान घेता यावे, यासाठी शाळांमध्ये सुरू झालेल्या वाचनालय संस्कृतीला सुरुंग लागला आहे.
शंकर चव्हाण जिवती
ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात वाचन संस्कृती जिवंत राहावी, शैक्षणिक अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान घेता यावे, यासाठी शाळांमध्ये सुरू झालेल्या वाचनालय संस्कृतीला सुरुंग लागला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी पुरविण्यात आलेली पुस्तकांना उंदरांकडून कुरतडले जात आहे. तर अनेक वाचनालयातील पुस्तकांवर धूळ अन् वाळवी लागल्याने विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तकांपासून वंचित राहवे लागत आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने विविध शाळांमध्ये भेटी देऊन पाहणी केली असता, हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
तालुक्यात १२८ जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. त्यात जवळपास साडेसहा हजार विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. उच्च शिक्षीत होण्याचे स्वप्न डोळ्यात ठेऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्याच्या दृष्टीने वाचनालयाची चळवळ राबविण्यात येत आहे. तालुक्यातील काही शाळांत अद्यापही वाचनालये सुरू आहेत. शाळांच्या वर्गखोल्या, परिसरातील वातावरण निर्मिती आणि शिक्षक व मुख्याध्यापकांच्या अचूक नियोजनायामुळे विद्यार्थीसुद्धा गुणवत्ताधारक बनू लागले आहेत. मग इतर शाळांत शिक्षणाचा खेळखंडोबा का? असा प्रश्न काही शाळांची अवस्था पाहिल्यानंतर मनात उपस्थित राहतो. शाळेला रंगरंगोटी नाही, खेळायला मैदान, संरक्षण भिंती नाहीत, परिसरातील घाणीबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. शौचालय असूनही कुठे पाण्याअभावी तर कुठे विद्यार्थ्यांच्या सवयी व जागृतीअभावी शौचालयांचा वापर नाही. शाळेत पुस्तक असुनही वाचायला मिळत नाही, हे भयान वास्तव आहे. ज्ञानार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानच मिळत नसेल तर करायचे का? उच्च शिक्षीत आणि सक्षम पिढी कशी घडेल, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिक्षण विभागाची अनास्था व दुर्लक्षीतपणामुळे वाचनालयाच्या पुस्तकांवर धूळ आणी वाळवी चढली आहे. शिक्षण विभागाने वेळीच लक्ष दिले तर वाचन संस्कृतीला विराम मिळाला नसता, हे तेवढेच खरे.
गोष्टीची पुस्तके अन् पोस्टर कचऱ्यात
शालेय विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी सर्व शिक्षा अभियानामध्ये आलेली गोष्टीचे पुस्तकं व पोस्टर पं. स.च्या इमारतीत कचऱ्यात असल्याचे फेरफटका मारताना दिसून आला. वाचनालय संस्कृती जिवंत रहावी, विद्यार्थ्यांना वाचनाची सवय जडावी, या उद्देशाने शाळांमध्ये वाचनालये सुरू केली. मात्र मूळ उद्देशाला हरताळ फासला जात आहे.