कोळशाच्या धुळीने पांढरे सोने काळवंडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 11:51 PM2017-11-30T23:51:59+5:302017-11-30T23:52:20+5:30
कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे.
प्रकाश काळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : कोळशाच्या धुळीने पांढरे सोने पूर्णत: काळवंडले असल्याने कापूस वेचणी करायला मजूर येत नाही. परिणामी, कापूस शेतकऱ्यांना नाईलाजाने झाडावरच ठेवावा लागत आहे. कोळशाच्या काळ्या धुळीने कापसाची प्रत घसरली असून कवडीमोल भावात हे पांढरे सोने विकावे लागत आहे.
राजुरा तालुका प्रदूषणात अग्रेसर आहे. तालुक्यात वेकोलिच्या मोठ्या प्रमाणात भूमिगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव परिसरात नेहमीच कोळशाचा धुराळा उडत असतो. या परिसरात कोळसा खाणी असल्याने पांढरे सोने समजले जाणारे कापसाचे पीक पूर्णत: काळे पडले आहे. परिणामी, या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धुळीमुळे धोक्यात आले आहे.
दिवसंरात्र सुरु असणारी जड वाहतूक व त्यापासून होणारे प्रदूषण हाही चिंतेचा विषय झाला आहे. याचे दुरगामी परिणाम परिसरातील जनतेला नेहमीच सहन करावे लागत आहे. यावर्षी कापसाला भाव नसल्याने शेतकºयांना कवडीमोल दरात आपला कापूस विकावा लागत आहे. हे शेतकºयांचे धगधगते वास्तव असताना कोळशाच्या धुळीने कापूस पीक पूर्णत: काळे पडले आहे. अशा कापसाला बाजारपेठेत कवडीमोल दर दिला जातो. त्याचा सारा आर्थिक भुर्दंड शेतकºयांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून सरकारने आता शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी होत आहे.
प्रदूषणाल आळा घालणार कोण ?
प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. चंद्रपूर जिल्हा प्रदूषणात अग्रेसर असताना येथील नागरिकांच्या जीवाला प्रदूषणाने धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील शेतीही प्रदूषणाने धोक्यात आली असून याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष पसरला आहे.
काळा कापूस वेचायला मजूर सापडेना
कोळसा खाण परिसर व रस्त्याच्या दुर्तफा असणारी शेती कोळशाच्या धुळीने पूर्णत: माखली आहे. सध्या शेतात कापसाचे पीक उभे आहे. परंतु कोळशाच्या धुळीने कापूस काळा पडल्याने असा काळा कापूस वेचायला मजूर येत नसल्याने कापूस अजूनही झाडावरच लोंबकळत आहे.