माजरी-कोंढा मार्गावर धुळीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:28 AM2021-05-21T04:28:47+5:302021-05-21T04:28:47+5:30
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होते. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या ...
भद्रावती : माजरी मार्गावरून मोठ्या प्रमाणावर कोळशाची वाहतूक होते. अनेक वाहने उघड्यावर कोळशाची वाहतूक करत असल्याने या रस्त्यावर कोळशाच्या धुळीचा थर साचून राहतो. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पाणी मागण्याची मागणी केली जात आहे.
दुर्गापुरात अपघाताची शक्यता वाढली
दुर्गापूर : दुर्गापूर-ऊर्जानगर परिसरातून चंद्रपूर-ताडोबा मार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक उभारावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या मार्गावर सतत वर्दळ असते.
गंजलेल्या वीज खांबामुळे अपघाताचा धोका
गोंडपिपरी : तालुक्यातील काही गावांतील विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खांब बदलण्याची मागणी केली जात आहे.
देऊरवाडा तीर्थक्षेत्राचा विकास करावा
भद्रावती : तालुक्यातील देऊरवाडा येथे अनेक धार्मिक ठिकाण आहेत. त्यांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन येथील पायाभूत विकास घडवून आणावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी सुविधा पुरविण्यास विकास होईल.
राष्ट्रीय महामार्गावर दिशादर्शकाचा अभाव
कोरपना : राजुरा ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील खिर्डी ते राज्य सीमादरम्यानच्या मार्गावर दिशादर्शक व अंतर फलक नसल्याने वाहतूकदारांची गैरसोय होत आहे. सदर महामार्ग जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीचा महामार्गापैकी एक आहे. त्यामुळे मोठी वर्दळ असते.
आरोग्य केंद्रात दंतचिकित्सकाची नियुक्ती करावी
गांगलवाडी : दिवसेंदिवस प्रत्येक आजारासोबत दातांचे आजारदेखील वाढत असून, दातदुखीच्या रुग्णसंख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, मात्र शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दंतचिकित्सकांची नियुक्ती केली नसल्याने या रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. त्यात त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
गॅस एजन्सी नसल्याने नागरिक त्रस्त
कोरपना : कोरपना तालुक्याचे ठिकाण आहे. मात्र, अधिकृत गॅस एजन्सी नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत आहे. येथे अधिकृत गॅस एजन्सी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. कोरपना येथे अधिकृत गॅस एजन्सी नसल्याने गॅस कनेक्शनधारकांना ५० किलोमीटर अंतरावरील बल्लारपूरला जावे लागते.
रिक्त पदांमुळे कामे खोळंबली
जिवती : येथील तहसील कार्यालयात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात. परंतु, कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी आहे.
वरोऱ्यातील रस्त्यांची दुरुस्ती करावी
वरोरा: येथील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहन चालविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी निवेदनातून केली आहे. रस्त्याअभावी अनेकवेळा अपघातही झाले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक बेजार
जिवती : तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गम भागात असलेल्या गावातील रस्त्यावरून जाणे तर जिकिरीचे झाले आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
अभ्यासवर्ग सुरू करण्याची मागणी
जिवती : दिवसेंदिवस तालुक्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. मात्र, ग्रामीण भागात पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना संधी मिळत नाही. त्यामुळे तालुक्यात अभ्यासवर्ग सुरू करावे, अशी मागणी युवकांकडून होत आहे.
घुग्घुसमधील बंद उद्योगांना सुरू करावे
घुग्घुस : या भागातील अनेक उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये सुशिक्षित बेरोजगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. घुग्घुसमधील एमआयडीसीमध्ये उद्योगांना घरघर लागली आहे. आयटीआयचे प्रशिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांमध्ये वाढ झाली आहे.
अनेकांनी सुरू केली मास्क विक्री
चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुन्हा रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये काही छोट्या-मोठ्या विक्रेत्यांनी मास्क विक्रीचा नवा व्यवसाय सुरू केला आहे.