मतिमंद चिमुकलीचा कालव्यात बुडून मृत्यू
By admin | Published: July 8, 2015 01:12 AM2015-07-08T01:12:30+5:302015-07-08T01:12:30+5:30
शहरालगत असलेल्या गोसीखुर्द कालव्यात पडून सात वर्षीय मतिमंद मुलीचा करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
ब्रह्मपुरी : शहरालगत असलेल्या गोसीखुर्द कालव्यात पडून सात वर्षीय मतिमंद मुलीचा करुण अंत झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.
ब्रह्मपुरी-नागभीड मार्गावर असलेल्या गोसीखुर्द कालव्यात नजीकच्या खेड येथील आचल दादाजी झरकर (७ वर्ष) या मतिमंद मुलीचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी २ वाजतापासून आचल घरून बेपत्ता झाली होती. गावात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र ती मिळून आली नाही. मंगळवारी सकाळी गोसीखुर्द कालव्यातील पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला.
आचल ही जन्मत: सर्वसाधारण होती. मात्र पाच वर्षाची असताना ती आजारी पडल्याने तिच्या वागण्यात बदल झाला. ती मतिमंद असल्याने तिला एकटी सोडून घरचे मंडळी बाहेर जात नव्हते. सोमवारी ती खेड येथील शाळेतून आजोबासोबत दुपारी २ वाजता घरी आली. मात्र त्यानंतर ती घरून अचानक बेपत्ता झाली. आजोबाने गावात सर्वत्र शोधाशोध केली. मात्र तिचा पत्ता लागला नव्हता. मंगळवारी सकाळी कालव्यात तिचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पं.स. सदस्य नामदेव लांजेवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. (शहर प्रतिनिधी)