डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती पालिका देशात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:06 AM2017-12-30T05:06:56+5:302017-12-30T05:07:10+5:30
भद्रावती (चंद्रपूर) : स्वच्छ सर्वेक्षण २०१८अंतर्गत अॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
भद्रावती (चंद्रपूर) : स्वच्छ सर्वेक्षण २०१८अंतर्गत अॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर ठरले आहे.
भद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमध्ये साडेचार हजार नागरिकांनी अॅप डाऊनलोड करून घेतले. त्यातील पावणेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शवीत आहेत. भद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढमधील सरायपल्ली या २० हजार लोकसंख्येच्या शहरासोबत होती. १५ दिवसांपासून हे शहर प्रथम क्रमांक टिकवून होते. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहरातील गुणांचा फरक हा पाच ते १० हजारांच्या दरम्यान होता. मात्र तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने २५ डिसेंबरला हा फरक केवळ १८० गुणांचा राहिला. अखेर त्यावर मात करीत २७ डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर दोन हजार गुणांची आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला. सद्य:स्थितीत भद्रावती शहराला ८८,०१८ व सरायपल्ली शहराला ८६,८०० गुण प्राप्त झाले आहेत.