योजनांची अंमलबजावणी गतिशील करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 11:19 PM2018-06-06T23:19:11+5:302018-06-06T23:19:20+5:30
केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्तरातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रत्येक योजनेचा आढावा सोमवारी केंद्रिय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी घेतला. यामध्ये प्रामुख्याने उज्ज्वला गॅस वाटप योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शुध्द पाणी पुरवठयाची अमृत योजना, महानगरातील पाणी पुरवठयासाठी नदी खोलीकरणाचा आढावा त्यांनी घेतला. चंद्रपुरातील नागरिकांना उत्तम नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी यंत्रणा अधिक सक्रीय व योजनांची अंमलबजावणी गतिशील करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला महापौर अंजली घोटेकर, प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, मनपा आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दिवसभरांच्या बैठकांमध्ये त्यांनी सर्वप्रथम उज्ज्वला गॅस योजनेचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या गतीने वाढावी, यासाठी असणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या. तर विविध गॅस कंपन्या आणि त्यांच्यावर नियंत्रण असणाºया जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांना आवश्यक सूचना केल्या. सामाजिक, आर्थिक सर्व्हेक्षणानुसार जिल्ह्यामध्ये एक लाख ७४ हजार पात्र कुटुंब आहेत. मात्र सध्या ५७ हजार कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेसाठी अंतोदयमध्ये येणारे कुटुंब, वनमजूर, अनुसूचित जाती, जमाती समुदायातील सर्व कुटुंब लाभार्थी ठरु शकतात. त्यामुळे या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात जनतेपर्यंत पोहचावा, असे आवाहन यावेळी ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर महानगराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत २३१.७७ कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी आली आहे. इरई धरणातून होणाºया या पाणी पुरवठा योजनेबाबतचा सद्यस्थिती आढावा ना. अहीर यांनी घेतला. पाणी पुरवठयाबाबत योग्य प्रमाणात वितरण व्यवस्था हाताळण्याची सूचना त्यांनी केली.