विराच्या दर्शनासाठी आतुर सचिनला तिच्या दोन बछड्याचे दर्शन
By राजेश भोजेकर | Published: December 23, 2023 04:56 PM2023-12-23T16:56:01+5:302023-12-23T16:56:53+5:30
बेलारा - गोंडमोहळी पर्यटन गेटवरून केली सफारी.
राजेश भोजेकर,चंद्रपूर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजली व मित्रांनी शनिवारी सकाळी बेलारा-गोंडमोहळी पर्यटन गेटवरून सफारी केली. या भागात वावर असलेल्या विरा आणि तिच्या बछड्यांचे दर्शन अपेक्षित होते. बरीच वाट बघितली. मात्र हिरमोडे झाल्याने ते रिसोर्टसाठी निघण्याच्या बेतात होते. अशातच अचानक विरा वाघिणीच्या दोन बछड्यांनी सचिनला दर्शन दिल्याने त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजलीसह काही मित्रांसोबत गुरूवारीपासून ताडोबात पर्यटनासाठी आले आहेत. या तीन दिवसात सचिनने ताडोबात वेगवेगळ्या पर्यटन गेटव्दारे सफारी केली. पहिल्याच सफारीत कोलारा परिसरातील विशेष आकर्षण असलेल्या तारा, बबली, बिजली आणि युवराजने सचिनला दर्शन दिले. बबली आणि बिजलीच्या बछड्यांचेही दर्शन घडले. तारा, बबली, बिजली आणि युवराजच्या दर्शनाने सचिन पत्नी चांगलेच भारावले.
मायाच्या आठवणीच उरल्या :
सचिन यापूर्वी पाचवेळा ताडोबात आले. विशेष म्हणजे सचिनला माया वाघिणीचे आकर्षण आहे. प्रत्येकवेळी माया वाघिणीचे सचिनला दर्शन व्हायचे. मायाचे दर्शन झाल्याशिवाय सचिनची पर्यटन सफारी अपूर्ण असायची. यावेळी मात्र त्यांना मायाचे दर्शन होणार नाही. कारण काही महिन्यांपासून माया ताडोबात दिसेनाशी झाली आहे. ताडोबाची क्वीन असलेली माया वाघिणीच्या फक्त आठवणी उरल्या आहेत. मायाच्या न दिसण्याने सचिनची सफारी यावेळी अपूर्णच राहणार आहे.