थंडीत गाजर खाल्ल्याने डोळ्यांपासून केसांपर्यंत फायदेच फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 15:19 IST2024-12-19T15:18:51+5:302024-12-19T15:19:52+5:30
मोठ्या प्रमाणात आवक : आरोग्यासाठीही तेवढाच फायदेशीर

Eating carrots in winter has many benefits, from eyes to hair.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : खाण्यापिण्याची खरी मजा हिवाळ्यात असते. कारण, हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होत असून, दरही माफक राहत असल्याने नागरिकांना खरेदी करताना अडचण होत नाही. विशेष म्हणजे, यामध्येच सध्या गाजरची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने दररोजच्या सलादमध्ये प्रत्येकच घरात गाजरचा वापर केला जात आहे. शिवाय गाजरचा हलवा म्हणताच तोंडाला पाणी सुटते. सुका मेवा टाकून तयार केलेला गाजरचा हलवा खाण्यासाठी जेवढा चविष्ट तेवढाच आरोग्यासाठी फायद्याचा आहे. त्यात सध्या गाजरचे दर कमी असल्याने होऊन जाऊ द्या, गाजरचा हलवा, असे म्हटले जात आहे.
गाजर हे एक पौष्टिक कंदमूळ आहे. ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. शिवाय गाजरात ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. शिवाय गाजरात व्हिटॅमिन-ए, बायोटिन, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी ६. बीटा कॅरेटीन, अल्फा कॅरेटीन, ल्यूटेन, लायकोपेन असते, जे फायदेशीर ठरते.
गाजर खाण्याचे फायदे
- गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि र्ड असल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.
- गाजरातील बिटा केरोटीन आणि कॅरोटेनॉडमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करणे सोपे जाते.
- गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यांचा रक्तदाबावर चांगला परिणाम होतो.
- गाजरात व्हिटॅमिन-ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचे ठरते.
- रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील व्हिटॅमिन ए फायदेशीर ठरते, म्हणूनच आहारात गाजराचा समावेश करा.
- गाजरातील बिटा कॅरोटीनमुळे तुमच्या शरीराला अँटिऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि तुमच्या हाडांचे आरोग्य वाढते.
केसांसाठीही गाजर फायद्याचे
केसांचे पोषण न झाल्यास केस निस्तेज होतात अथवा अकाली गळतात. मात्र, जर घनदाट काळेभोर केस हवे असतील, तर आहारात गाजरचा समावेश करावा. शिवाय, गाजरामधील पोषक घटकांमुळे केस कमकुवत होणे, केसांना फाटे फुटणे, केस कोरडे आणि निस्तेज होणे कमी होते.
दररोज गाजर खाणे आरोग्यासाठी लाभदायक
माणसाच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरु राहण्यासाठी व्हिटॅमिन-ए ची गरज असते. शिवाय गाजरात फायबर्सही भरपूर असतात, ज्यामुळे अपचनाची समस्या होत नाही. यासाठी आहारात गाजराचा रस, कोशिंबिर, सलाद, हलवा जरूर असायला हवा. गाजराचे तुकडे करून ते कच्च्या स्वरूपात खाणे नेहमीच योग्य. गाजराचा रस पिणे शक्य असेल, तर तो प्या, ज्यामुळे गाजरामधील फायबर्स तुमच्या सहज पोटात जातील, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
सौंदर्यावर गाजराचे फायदे
आहारात नियमित गाजराचा समावेश असेल, तर त्वचेच्या समस्या कमी होतात. गाजराचा रस पिण्याने त्वचा हायड्रेट राहते व चेहऱ्यावर एक नैसर्गिक ओलावा आल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण होते व त्वचेवरील डाग आणि वाण कमी होतात.