हागणदारीमुक्तीला वाढीव कुटुंबांचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 11:32 PM2018-04-28T23:32:47+5:302018-04-28T23:48:45+5:30
राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य सरकारने १०० टक्के शौचालय बांधून पुर्ण झाल्याचा दावा एक आठवड्यापूर्वी केला होता. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी स्वच्छता भारत मिशनतर्फे प्रभावी अंमलबजावणी केल्याचे जाहीर केले होते. मात्र जिल्ह्यामध्ये तब्बल २२ हजार वाढीव कुटुंबीयांपर्यंत अद्याप शौचालयाची योजनाच पोहचली नाही. या कुटुंबीयांना आता स्वच्छ भारत मिशनऐवजी मनरेगा व अन्य योजनेतून शौचालय बांधून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जिल्ह्यातील १५ पंचायत समितीमध्ये २०१२ ला पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये तीन लाख ३० हजार कुटुंबीयांची नोंदणी पूर्ण झाली. यात सर्वेक्षणानुसार त्यावेळी जिल्ह्यातील १ लाख ५८ हजार ५६६ कुटुंबीयांनी शौचालय बांधल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संबंधित यंत्रणेमार्फत गाव पातळीवर सर्वेक्षणाचा वेग वाढवून नव्याने माहिती हाती घेण्याचे काम सुरू केले. त्यातून एक लाख ४४ हजार ५२९ कुटुंबीयांकडे शौचालयाची योजना पोहचली नाही. ही माहिती पुढे आली.
२०१४ मध्ये निर्मल स्वच्छता अभियान योजनेचे नामांतर करून स्वच्छता भारत मिशन या नावाने सरकारने वैयक्तिक शौचालय बांधण्याचे जिल्हानिहाय उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टानुसार जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेकडून तीन लाख ३ हजार ९५ व्यक्तिक शौचालय बांधण्याचे लक्ष्य देण्यात आले. जिल्हा परिषदेने संबंधित यंत्रणेला गतिमान करून मार्च २०१८मध्ये हे उद्दिष्ट १०० टक्के पूर्ण केले. बेसलाईन नंतर मार्च २०१८ अखेर साध्य केलेले हे उद्दिष्ट लक्षवेधी असले तरी वाढीव २२ हजार कुटुंबीयांना वैयक्तिक शौचालयाचा लाभ पोहोचविण्यासाठी जि.प. प्रशासनाची दमछाक झाली. याबाबत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले, जिल्ह्याचे उद्दीष्ट्य पूर्ण झाले असून वाढीव कुटुंब शिल्लक आहे.
यंत्रणेची उदासीनता
पायाभूत सर्वेक्षणानंतर वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय यंत्रणा गावकऱ्यांना या योजनेचे महत्त्व पटवून देण्यास कमी पडली, असा आरोप काही ग्रामपंचायतींनी केला आहे. ही योजना गावखेड्यात पोहोचविण्यासाठी संबंधित कर्मचाºयांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन पाठपुरावा केला असता तर वाढीव कुटुंबांनादेखील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय योजनेचा लाभ घेता आला असता, असा दावाही त्यांनी केला आहे. वाढीव कुटुंबांना नव्या योजनेतून शौचालय बांधून देण्याचे नियोजन सरकारने केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला हा सरकारचा दावा कसा मान्य करायचा, असा प्रश्नही सरपंचांनी विचारला आहे.
तीन पंचायत समित्यांची आघाडी
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी ब्रम्हपुरी, चिमूर आणि वरोरा तालुक्याने आघाडी घेतली. चिमूर (३०९१९), ब्रम्हपुरी (२९७६७), वरोरा (२७६९६) शौचालय बांधून उद्दिष्ट पूर्ण केले. चंद्रपूर पंचायत समितीने २५ हजार ८६१ शौचालय बांधली. ग्रामपंचायतचे पदाधिकारी, ग्रामसभेच्या जागरूकतेमुळे या योजनेला यश मिळाले.