तोडगा न निघाल्याने ईको-प्रोचे अन्नत्याग उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:28+5:302021-03-04T04:54:28+5:30
चंद्रपूर : मागील दहा दिवसांपासून ईको प्रोचे बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव खोलीकरण स्वच्छता आणि संवर्धनाच्या मागणीसाठी अन्नत्याग ...
चंद्रपूर : मागील दहा दिवसांपासून ईको प्रोचे बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात रामाळा तलाव खोलीकरण स्वच्छता आणि संवर्धनाच्या मागणीसाठी अन्नत्याग सत्याग्रह सुरू आहे. प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर धमेंद्र लुणावत यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, धोतरे पुन्हा उपोषण मंडळात दाखल झाले असून, त्यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी ईको प्रोने आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेत सात दिवसांच्या आतमध्ये रामाळा तलावाच्या संवर्धनासंबंधी प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र या माध्यमातून रामाळा संवर्धन करणे शक्य नसून जिल्ह्यात असलेल्या खनिज विकास निधीतून रामाळाचे संवर्धन करावे, या मागणीवर धोतरे ठाम आहेत. त्यामुळे अजूनही यावर तोडगा निघाला नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील विविध राजकीय, सामाजिक संस्था, शाळा तसेच पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.