ब्रह्मपुरीच्या गणेशोत्सव जत्रेला कोरोनाचे ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:34 AM2021-09-10T04:34:08+5:302021-09-10T04:34:08+5:30
ब्रह्मपुरी : पंचक्रोशीत ब्रह्मपुरीची गणेशोत्सव जत्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. या उत्सवाची बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण आतुरतेने ...
ब्रह्मपुरी : पंचक्रोशीत ब्रह्मपुरीची गणेशोत्सव जत्रा गेल्या ५० वर्षांपासून प्रसिद्ध आहे. या उत्सवाची बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण आतुरतेने वाट पाहत असतात; परंतु यावर्षी या उत्सवाला कोरोनाचे ग्रहण लागल्याने आनंदावर विरजण पडले आहे.
ब्रह्मपुरीतील गणेशोत्सव म्हणजे दहा दिवसांची पर्वणी होय. या जत्रेसाठी नागभीड, वडसा, आरमोरी, लाखांदूर, पवनी, सिंदेवाही आदी तालुक्यांतील भाविक पूर्वी रेंगी बैलाच्या जोडीने व अलीकडे ट्रॅक्टरने लोकांचे मोठ्या प्रमाणावर आवागमन होत असल्याने ब्रह्मपुरी नगरी दुमदुमली असायची; परंतु आता हे दिवस काही काळासाठी दृश्यहीन झाले आहेत. ब्रह्मपुरीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९६२ ला सर्वप्रथम करण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सर्वप्रथम वेगवेगळ्या कथांच्या आधारावर देखावे सादर करून त्यांना स्वयंचलित करण्याचे रूप दिले होते. त्यानंतर माजी आमदार स्व. बाबासाहेब खानोरकर यांनी या उत्सवाला मोठे रूप देऊन ही जत्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध केली आहे. आजघडीला ब्रह्मपुरीत १३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामध्ये स्व. बाबासाहेब खानोरकर सार्वजनिक गणेश मंडळ व नेवाजाबाई भैया हितकारिणी सार्वजनिक गणेश मंडळ प्रमुख आहेत. या गणेशोत्सवात ज्ञान प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत व खवय्यांसाठी विविध पदार्थांचे स्टॉल आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणून असायचे. निरनिराळे झुले, मौत का कुंवा, रेल्वेगाडी, विविध खेळ अशांनी जत्रा प्रसिद्ध होत गेली; परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या महामारीमुळे ६० वर्षांपासूनच्या जत्रेला खंड पडल्याने विशेषतः लहान बालकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. ही जत्रा ब्रह्मपुरीच्या परिचयाची, एक विशेष झलक होती. या निमित्ताने ब्रह्मपुरी दहा दिवस गजबजलेली असायची. प्रत्येक घरी पाहुण्यांची वर्दळ असायची. या सर्व क्षणांना कोरोनाने हिरावले आहे. पुन्हा या जत्रेचे दिवस केव्हा येणार, याची चर्चा सर्वत्र करण्यात येत आहे.