रिक्त पदांमुळे जिवतीच्या विकासाला ग्रहण
By admin | Published: December 27, 2014 10:48 PM2014-12-27T22:48:32+5:302014-12-27T22:48:32+5:30
पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली.
चंद्रपूर : पहाडावरील गावांचा विकास व्हावा, त्यांना सोयीसुविधा त्वरित उपलब्ध व्हाव्या, नागरिकांना शासकीय कामे पूर्ण करताना व्यत्यय येऊ नये यासाठी जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र तालुका निर्मितीनंतरही येथील नागरिकांच्या समस्या सुटल्याच नाही. केवळ डोक्यावर हात मारून येथील नागरिक आपल्याच नशिबाला दोष देत आहेत. येथील पंचायत समितीमध्ये विविध विभागातील तब्बल ६० पदे रिक्त आहे. रिक्त पदांमुळे जिवती तालुक्याच्या विकासाला ग्रहण लागले आहे.
अतिदुर्गम आणि पहाडावरील नागरिकांच्या अनेक समस्या आहे. रस्ते पाणी, वीज, शिक्षण, एवढेच नाही तर रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. रोजगारासाठी अनेक नागरिक तालुका सोडून इतरत्र भटकत आहे. त्यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात येत आहे. एक ना अनेक समस्या असलेल्या जिवती तालुक्यामध्ये शासकीय कार्यालयातील विविध पद रिक्त आहे. काही अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी रहात नाही. त्यामुळे नागरिकांचे कामे वेळेवर होत नाही. परिणामी अनेक शासकीय योजना असतानाही त्या नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे येथील रिक्त पद त्वरित भरून विकासाला चालना द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य सुजाता भगत यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश गावामध्ये अद्यापही पाणी पुरवठा योजना नाही. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. काही गावात रस्ते, वीज नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. केवळ कागदोपत्री योजना राबवून अधिकारी मोकळे होत आहे. मात्र प्रत्यक्षात येथील नागरिकांचे मोठे हाल होत आहे. आंध्र आणि महाराष्ट्र सिमेवर असलेल्या बारा गावांचा अद्यापही प्रश्न सुटला नाही. दोन राज्याच्या भांडणात नागरिकांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. येथील नागरिकांचा विकास करायचा असेल तर प्रथम येथे शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी रिक्त असलेले पदे भरणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय योजनांची माहिती आणि अंमलबजावणी कशी करणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. केवळ आश्वासन नाही तर ठोस उपाययोजना करून येथे विकास साधावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)