परंपरागत व्यवसायाला ग्रहण
By admin | Published: April 10, 2015 12:53 AM2015-04-10T00:53:22+5:302015-04-10T00:53:22+5:30
थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे.
गुंजेवाही : थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे आजही उपेक्षित जीवन जगत आहे. त्यांचा परंपरागत व्यवसाय लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
उन्हाळ्यात जिवाची लाही लाही होत असताना माठातील शितल जल अमृताप्रमाणे असते. गरिबांचा फ्रिज म्हणून पहिली पसंती माठाला असते. परंतु माठ घडविणारा समाज आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहे. उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळावे म्हणून कुंभार समाज माठ तयार करतो. माठ घडविण्यासाठी कुंभाराला गरम भट्टीचे व शासन तथा समाज व्यवस्थेचे चटके सहन करावे लागत आहे. गुंजेवाही व परिसरात जिथे त्यांचे वास्तव्य आहेत, तिथे कुंभार मोहल्ला अशी स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. बारा बलुतेदारांपैकी एक असा हा समाज. परंपरा जोपासत पूर्वजापासून चालत असलेला आपला व्यवसाय पुढे चालवित आहे. मात्र अलिकडे त्यांची ही कला शासनाच्या उदासीनतेत सापडली आहे. अॅल्युमिनियम, स्टील, पितळ आणि प्लॅस्टीकच्या अनेक वस्तु बाजारात उपलब्ध असल्याने मातीची काही गृहोपयोगी भांडी नामशेष झाली आहेत. परंतु थंड पाण्यासाठी असलेला माठ आजही गरिबांचा फ्रिज म्हणून वापरात आहे.
शेतकऱ्यांना शेतात पिकविणे माहीत आहे. परंतु विकणे माहीत नाही. त्याचप्रमाणे कुंभार समाजाला फक्त माठ बनविणे माहीत आहे. परंतु त्याहून मोठ्या आर्थिक लाभाचा मार्ग अवगत नाही. या माठ व्यवसायात इतर जाती समुहाचे विक्रेते तयार झाले आहेत. कुंभार समाजात शिक्षणाचा प्रसार अत्यल्प असल्याने संपूर्ण कुटुंब याच व्यवसायावर अवलंबून आहे. दिवसभर कामामुळे आपल्या मुलांकडे लक्ष देता येत नाही. मार्गदर्शनाचा अभाव व आईवडीलांची कसरत पाहून मुले शिक्षणापासून वंचित राहून व्यवसायाकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहेत. या व्यवसायात इंधनासाठी लागणारे लाकडे व माती हेच साहित्य महत्त्वाचे असले तरी वन कायद्यामुळे तेही आज दुर्मिळ झाले आहेत. जीवन जगण्यासाठी समाजाकडे दुसरा व्यवसाय नाही. समाज बांधव शेती करतात. अनेकजण मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे थंड पाण्याच्या माध्यमातून कित्येकांचा आत्मा शांत करणारा कुंभार समाज आजही उपेक्षीत जीवन जगत आहे. (वार्ताहर)