चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्क उभे राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 10:29 PM2018-12-01T22:29:00+5:302018-12-01T22:29:20+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगिचे उभे राहावेत, यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी निधी मंजूर केला आहे. चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा आधी तालुक्यांच्या ठिकाणानंतर आता या तीन तालुक्यात अत्याधुनिक इको पार्क उभा राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी आधुनिक बाग-बगिचे उभे राहावेत, यासाठी प्रयत्नरत असणारे राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी चिमूर, सिंदेवाही व नागभीड येथे इको पार्कसाठी निधी मंजूर केला आहे.
चंद्रपूर, मूल, पोंभूर्णा आधी तालुक्यांच्या ठिकाणानंतर आता या तीन तालुक्यात अत्याधुनिक इको पार्क उभा राहणार आहे.
चंद्रपूर महानगर, चंद्रपूर शहर, मूल नगरपालिका, पोंभूर्णा नगरपंचायत येथे अत्याधुनिक बाग निर्माण करण्याच्या संकल्पाला पूर्ण केल्यानंतर आता या तीन तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क तयार करण्याच्या कामाला आज पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंजुरी दिली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना अन्य मोठ्या शहरांप्रमाणे अत्याधुनिक इको पार्कची सुविधा मिळावी, यासाठी त्यांनी हा निधी उपलब्ध केला आहे.
ब्रह्मपुरी व मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिकेच्या अंतर्गतही मोठ्या प्रमाणात छोटे-छोटे इको पार्क निर्माण केले आहे. याशिवाय चंद्रपूर महानगराच्या सीमावर्ती भागात बल्लारपूर रोडवरदेखील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पार्क दिमाखात उभे झाले आहे. शहरासाठी हा पार्क एक मोठी ओळख झाली आहे. मूल येथील पार्कदेखील नागरिकांच्या पसंतीला उतरले आहे. तर पोभुर्णासारख्या छोट्या ठिकाणीदेखील इको पार्कला जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व तालुक्याच्या ठिकाणी इको पार्क उभारण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रयत्न सुरू आहेत.
बल्लारपूरजवळ तर राष्ट्रीय दर्जाचे बॉटनिकल गार्डन उभे राहत आहे.