रामाळाच्या संवर्धनासाठी इको-प्रोचे अन्नत्याग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:44 AM2021-02-23T04:44:29+5:302021-02-23T04:44:29+5:30
चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी रामाळा तलावाच्या काठावर सोमवारपासून ...
चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन ऐतिहासिक वारसा असलेला रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करून खोलीकरणाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी रामाळा तलावाच्या काठावर सोमवारपासून इको-प्रोतर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव अतिक्रमणाने गिळंकृत होत आहे. तलाव खोलीकरण आणि प्रदूषणाची समस्या गंभीर होत आहे. मात्र, वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सन २००८ मध्ये रामाळा तलावात आलेली इकाॅर्निया वनस्पती निर्मूलनाची मागणी व स्वच्छता अभियान राबविण्यापासून इको-प्रो सातत्याने पाठपुरावा करीत आहे. रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करण्याच्या अनुषंगाने आवश्यक खोलीकरण व सौदर्यीकरण्याकरिता तलाव प्रदूषित होण्याची कारणे याचा अभ्यास करून वेळोवळी प्रशासनापुढे ठेवण्यात आला आहे. मात्र कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे सोमवारपासून इको प्रोतर्फे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. उपोषणाच्या पूर्व संध्येला इको-प्रोची मोटरसायकल रॅली काढून ठिकठिकाणी पत्रके वाटप करण्यात आली. रामाळा तलाव संवर्धनासंदर्भात मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांना देण्यात आले. उपोषणाच्या पहिल्या दिवशी अनेक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी भेट देत समर्थन व पाठिंबा दर्शविला. निवेदन देताना इको-प्रोचे बंडू धोतरे, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, अब्दुल जावेद, धर्मेंद्र लुनावत यांच्यासह इको-प्रोचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.